मनमाड : मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान करोना संसर्ग टाळण्यासाठी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात प्रायोगिक तत्त्वावर पायाने कळ दाबून सुरू होणारे नळ बसविण्यात आले आहेत. मनमाडच्या कार्यशाळेत ही यंत्रणा बनविण्यात आली असून त्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासात स्वच्छतागृहालगत असलेल्या बेसिनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बेसिनखाली पायाने दाबला जाणारा टॅप बसविण्यात आला आहे. या यंत्रणेसाठी नाममात्र खर्च आला आहे. सध्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात ही यंत्रणा बसविली असून संपूर्ण गाडीसाठी हे नियोजन सुरू आहे. वरिष्ठ मंडल (यांत्रिक) अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मंडल (यांत्रिक) अभियंता जी. रमेश, एम. के. शिवहरे, नितीन यादव यांच्यासह ही यंत्रणा बनविण्यासाठी कनिष्ठ अभियंता सलील दातार, हेमंत डोंगरे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रयोगाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पंचवटी एक्स्प्रेस ही मनमाड येथील कोच केअर सेंटरमधून सुटत असल्याने या गाडीमध्ये करोना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.