मालेगाव – नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन करुनही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याचा आक्षेप घेत येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे बुधवारी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रतिकात्मक बोकड बळी देत अनोखे आंदोलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक: डॉक्टर जावईने अमेरिकेत मुलीसह नातवंडांना डांबले; महिलेच्या तक्रारीनंतर पाच जणांविरुध्द गुन्हा

समितीतर्फे कित्येक वर्षांपासून शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी अनेकदा अर्ज देण्यात आले. आंदोलनांचा मार्ग अनुसरण्यात आला. परंतु, महापालिका प्रशासन प्रत्येक वेळी केवळ कालापव्यय करीत असल्याचा समितीचा आरोप आहे. मार्च महिन्यात शहरातील सरदार चौक आणि शनि चौक या भागात जलवाहिनी फुटल्याची समस्या उद्भवली होती. त्यावेळी जलवाहिनी दुरुस्तीचे थातूरमाथूर काम करून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे झाला. तसेच १५ व्या वित्त आयोगातून या ठिकाणी तीन कोटी रुपये खर्चाची जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाईल,असे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत त्यासंबंधी कुठलेच काम झाले नाही. याउलट ऐन गणेशोत्सवात पुन्हा गळती लागल्याने या जलवाहिनीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. चार-पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही गळतीची ही समस्या महापालिका दूर करु शकली नाही. त्यामुळे ओल्या रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत,अशी तक्रार समितीने केली.

हेही वाचा >>> जळगाव : पांढर्‍या सोन्याच्या चोरीच्या घटनांमुळे बळीराजाला आर्थिक फटका

शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांमधील रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात वाहून येण्याच्या गंभीर समस्येकडे देखील पालिका आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची समितीची तक्रार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणास जाऊन मिळणाऱ्या मोसम नदीच्या या जल प्रदूषणामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे नाही का, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणे मुश्कील होत आहे. अतिक्रमणांमुळे अपघात वाढत आहेत. मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेची इच्छाशक्ती दिसत नाही. शहरातील २१ ठिकाणी जाहीर केले गेलेले वाहनतळ केवळ कागदावर दिसत आहेत. मंजूर विकास आराखड्याप्रमाणे शहरात एकही विकास काम होत नाही,अशा तक्रारी करत या संदर्भात झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी प्रतिकात्मक बोकडाचा बळी देण्याचे आंदोलन करण्यात येत असल्याचेही समितीने म्हटले आहे. प्रारंभी समितीतर्फे बोकड व प्रतिकात्मक बोकडाची रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, देवा पाटील, कैलास शर्मा, मुरलीधर पाटकर, जितेंद्र देसले, शाम गवळी, जगदीश भुसे, क्रांती पाटील आदी सहभागी झाले होते.