लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात सर्व उपचार पध्दतींचा समावेश असलेल्या ’इक्षणा’ वस्तुसंग्रहालय उभारणीसंदर्भात परस्पर सामंजस्य करार केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाचा विभाग असलेल्या कोलकाता येथील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमशी (एनसीएसएम) करण्यात आला.
दूरस्थ प्रणालीव्दारे एनसीएसएमचे महासंचालक ए. डी. चौधरी आणि आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्यात करार झाला. यावेळी कुलगुरु कानिटकर यांनी, आरोग्य क्षेत्रातील माहिती समाजातील जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संग्रहालयाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. आरोग्य क्षेत्रातील विविध विद्याशाखांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध याची माहिती सर्वांना होण्यासाठी संग्रहालय महत्वपूर्ण आहे. डिजिटल आणि तंत्रस्नेही प्रकारात मांडणी करुन विद्यापीठातील संग्रहालय अधिक सुसज्ज करण्यात येत आहे.
आणखी वाचा- नाशिक : कांदा निर्यात बंदीवरुन विरोधक आक्रमक तर, सत्ताधाऱ्यांना शहरी मतांची चिंता
आगामी कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी, यासाठी हे संग्रहालय उपयुक्त ठरु शकेल, असे त्यांनी सांगितले. एनसीएसएमचे महासंचालक चौधरी यांनी, आरोग्य क्षेत्रातील ‘इक्षणा’ संग्रहालय हा अनोखा प्रकल्प विद्यापीठाबरोबर करण्याची संधी आम्हाला मिळाल्याने योग्य पध्दतीने मांडणी व रचना करण्यात येईल, असे सांगितले. सामंजस्य करारात नमूद केलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. देशभरात संस्थेतर्फे ३६ विविध प्रकल्पांवर काम सुरु असून इक्षणाचा हा प्रकल्प आगळा-वेगळा ठरणारा आहे, असे चौधरी यांनी सांगितले.