नाशिक : जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसात अनेक घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी कांदा चाळींचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात १० ते १२ घरांचे नुकसान झाले. नाशिक, दिंडोरी, चांदवड तालुक्यासह अभोणा शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरात झाडे उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

मागील दोन, तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. शुक्रवारी दुपारनंतर वातावरण अकस्मात ढगाळ होऊन वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील कानमांडळे गावात वादळी वाऱ्याने १० ते १२ घरांचे अंशत: नुकसान झाले.

हेही वाचा…नरहरी झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर ?

वीज पडून गाय मृत्युमुखी झाली. उभोणा शिवारात जोरदार वादळी पावसाने अभोणा-कळवण रस्त्यावर कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन घरांचे पत्रे उडाले. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. दिंडोरीतील अनेक भागात अर्धा तास वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी शिडकावा झाला. नाशिक शहरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात मोठी झाडे उन्मळून पडली.

हेही वाचा…धुळे जिल्ह्यात पोलीस वाहन, रुग्णवाहिकेवर दगडफेक करणाऱ्या जमावाविरुध्द गुन्हा

फांद्या पडून वीज वाहिन्यांचे नुकसान होऊन सिडको, उत्तमनगर, हिरावाडी, पंचवटी, गंगापूर रोड, रविवार कारंजा, मेनरोड आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. कर्मचाऱ्यांच्या मदतीने उन्मळून पडलेली झाडे व फांद्या बाजुला करण्याचे काम हाती घेतले गेले. काही ठिकाणी नव्याने खांब उभारत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेक भागातील वीज पुरवठा तासाभरात पूर्ववत करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे.

Story img Loader