नाशिक – जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने १२९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक ११७५ हेक्टरवरील कांद्याचा समावेश आहे. अवकाळीने ३० गावांतील १९९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यात अवकाळीने जोरदार हजेरी लावली. शिंदे, पळसे, माडसांगवी परिसरात गारपीट झाली होती. यामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने प्रशासनाला सादर केला आहे. बागलाण, कळवण, दिंडोरी आणि नाशिक या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस जोरदार झाला. यात ११७५ हेक्टवरील कांदा, १० हेक्टरवरील गहू, ६० हेक्टरवरील भाजीपाला, २० हेक्टरवरील द्राक्षे, १९ हेक्टरवरील डाळिंब व अन्य पिकांचे नुकसान झाले.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी कांदा काढणीला सुरुवात केली होती. खळ्यात काढून ठेवलेला हा कांदा मोठ्या प्रमाणात भिजला. काढणीवर आलेला कांदाही भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. बागलाण तालुक्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. या एकाच तालुक्यात ११५० हेक्टरवरील कांदा, १५ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले. बागलाण तालुक्यातील १८ बाधित गावांमध्ये १७०० शेतकरी, कळवणमधील एका गावात १२०, नाशिकमधील चार गावांत १३४ आणि दिंडोरी तालुक्यातील सात गावातील ३६ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्या्चे अहवालात म्हटले आहे.