नाशिक – जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. चांदवड, देवळा तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. रब्बी पिकांना पाऊस नुकसानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.नांदगाव तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरात दुपारी अर्धा तास सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. सखल भागात पाण्याचे तळे साचले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
गहू, ज्वारी, मका, कांदा या पिकांना तो नुकसानकारक आहे. विशेषत: गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. देवळा तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे, चिंचवड परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. चांदवड तालुक्यातही काही भागात कमी-अधिक पाऊस झाला. नाशिक पूर्व भागात सायंकाळी काही भागात तुरळक पाऊस पडला. बदलत्या वातावरणाने द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती आहे. सध्या द्राक्ष काढणीने वेग घेतला आहे. सायंकाळपर्यंत द्राक्षबागा असलेल्या कोणत्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याचे नाशिक विभागीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी सांगितले.