नाशिक : शहराचे सांस्कृतिक वैभव ठळकपणे अधोरेखीत करणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठावरील पाडवा पटांगण येथे महानगर पालिकेच्या सहकार्याने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत १८ मार्च रोजी महावादन होणार असून या कार्यक्रमांवर पावसाचे सावट आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शहर परिसरातील वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्था सहभागी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता पाडवा पटांगण येथे महावादन होणार आहे. शहर परिसरातील वेगवेगळी ढोल पथके यामध्ये सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजता नृत्य, गायन, वादन याचा अविष्कार असलेला अंतर्नाद हा अनोखा कार्यक्रम नाशिककरांसाठी सादर होईल. ४०० कथक नृत्यांगणा, ५० हून अधिक भरतनाट्यम कलावंत, तबला वादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. २० मार्च रोजी सकाळी सहा वाजता पर्यावरण या संकल्पनेवर महारांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच प्रात्यक्षिक सायंकाळी सहा वाजता भरविण्यात येणार आहे. नाशिककरांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागत समिती व महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा… धुळ्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तृतीयपंथीय उत्तीर्ण
हेही वाचा… नंदुरबार जिल्ह्यात जोरदार गारपीट; शेतकऱ्यांना मार्चमध्ये दुसऱ्यांदा फटका, पाहा व्हिडिओ
दरम्यान, या सर्व सण, उत्सव कार्यक्रमांवर पावसाचे सावट आहे. अंतर्नाद कार्यक्रमाची रंगीत तालीम सध्या त्र्यंबक रस्त्यावरील फ्रावशी अकॅडमी येथे सुरू आहे. शहरातील अन्य ठिकाणी ताल वादनाचा सराव सुरू आहे. गोदाकाठावर कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयारीने वेग घेतला असला तरी पावसाची धास्ती कायम आहे. याविषयी नववर्ष स्वागत समितीचे प्रफुल्ल संचेती यांनी माहिती दिली.