लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने पंचवटी विभागात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि विक्री प्रकरणी चार व्यावसायिकांवर कारवाई केली. संबंधितांना प्रत्येकी पाच हजार यानुसार २० हजार रुपये दंड करण्यात आला. कारवाईत १६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

मनपाच्या सहा विभागात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करु नये यासाठी जनजागृती केली जात आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. मनपाच्या पथकांनी पेठ रोड, दिंडोरी रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतील आणि बाहेरील विक्रेते, हिरावाडी आदी ठिकाणी पाहणी करुन कारवाई केली. अनेक भागात स्वच्छतेच्या पाहणीवेळी भाजी, मटण-चिकन विक्रेते, दूध विक्रेते, बेकरी दुकानदार, व्यावसायिक आदी ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. महाराष्ट्र अविघटनशिल कचरा (नियंत्रण)अधिनियमान्वये प्लास्टिक आणि थर्मोकोल अविघटनशील वस्तूचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचनेनुसार व मनपा आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-जळगावातील शिवाजीनगर-हुडकोत हवेत गोळीबार; संशयित ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. १६ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन थुंकीबहाद्दरांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. असा एकूण २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या कारवाईप्रसंगी पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक दीपक चव्हाण, उदय वसावे, किरण मारू, डी. बी. माळेकर, स्वच्छता मुकादम संजय पडाया आदी उपस्थित होते.