नाशिक – इगतपुरी तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात काही वेळा स्फोटकांचा वापर केला जात असून स्फोटकांमुळे रस्त्यालगत असलेल्या घरांना तडे जात आहेत. याविषयी कंपनी अधिकारी, प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणीच मदत करत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यात चार वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी बऱ्याचदा खड्डे खोदण्यात येत आहेत. या कामासाठी स्फोटकांचा वापर करू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी अनेक वेळा केलेली असतानाही स्फोटकांचा वापर केला जात आहे. शनिवारी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर झाला. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील उघडेवाडी परिसरातील १६ हून अधिक घरांना तडे गेले. घरांना बसणाऱ्या धक्क्यांमुळे मांडणीत ठेवलेली भांडी पडली. घरातील सामानाची नासधूस झाली. पावसाळा काही दिवसांवर असताना घरांना तडे गेल्याने हे तडे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी महामार्गाच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे केली. याविषयी देवराम पोकळे या ग्रामस्थाने व्यथा मांडली. महामार्गाच्या कामासाठी याआधी एकदा स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र शनिवारी स्फोटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. यामुळे घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – उष्णतेच्या लाटेने जळगावकर घामेघूम; उष्माघाताचा धोका वाढला
याविषयी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी स्फोटकांच्या वापरामुळे घराला तडे जात असल्याचे मान्य करून याविषयी त्या गावातील काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एकत्रित पंचनामे करण्यात येतील, असे सांगितले. संबंधितांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासनही कासुळे यांनी दिले.