लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगाव या सात तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले होते. आता लम्पी नियंत्रणात आला आहे. जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ११० जनावरांचे लसीकरण झाले असून, लसीकरणाने गती घेतली आहे. नव्याने लम्पी लागण झालेल्या जनावरांची संख्या मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव या सात तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुसंवर्धन विभागाचा वेळोवेळी आढावा घेत उपाययोजना केल्या. गेल्या आठवड्यात सात तालुक्यांतील सर्व जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रसाद यांनी दिले होते.

हेही वाचा… त्रिशूळ संग्रहालयातून लष्करी पर्यटनाची मुहूर्तमेढ; भारत-चीन संघर्षांच्या इतिहासाची मांडणी, महाराष्ट्राचा पुढाकार, लेहमध्ये उद्या भूमीपूजन

लम्पी प्रादुर्भावग्रस्त गावांपासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. चाळीसगावसारख्या जास्त प्रादुर्भाव असलेल्या तालुक्यात चार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के लसीकरण झाले आहे. रोज दिलेल्या उद्दिष्टाच्या शंभर टक्के लसीकरण करण्यात येत आहे. रोजची लम्पी लागण संख्या ५०० ते ५३५ दरम्यान मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. प्रकृती अस्थिर असलेल्या जनावरांची वैद्यकीय अधिकार्यांच्याकडून नियमित तपासणी करून घेण्यात येऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination of five lakh animals to control lumpy disease in jalgaon dvr