रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाचा उपक्रम
प्रेमाचे बंध जोडणारा जागतिक प्रेम दिवस रविवारी तरुणाईकडून विविध माध्यमातून साजरा केला जाईल. त्याविषयी परस्परविरोधी प्रतिक्रिया आधीपासून उमटत आहेत. मात्र, याच दिवशी डोंगरदऱ्यातील वाघेरा परिसरात तरुणाईच्या एका घटकाकडून सामाजिक जाणिवांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडणार आहे. शिक्षणाचे पाठ गिरवताना रात्र अंधारात काढणाऱ्या ५०० आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन तरुणाईच्या पुढाकारातून प्रकाशमान होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांपासून ते नाशिकमधील रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघ व इतर सहकाऱ्यांपर्यंत सर्वानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आदिवासी विद्यार्थ्यांशी प्रेमाचा ऋणानुबंध जोडला आहे.
नाशिकपासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असणारा वाघेरा हा तसा डोंगराळ परिसर. आदिवासी पट्टय़ात महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा आहे. शाळेच्या वसतिगृहात सौर ऊर्जेवर कार्यान्वित केलेल्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा जागतिक प्रेमदिनी अर्थात रविवारी होत आहे. ही संकल्पना आकारास येण्यामागील कथा रंजक आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा विषय माजी विद्यार्थी संघाच्या मनात घोळत होता. संघाचे प्रमुख कौस्तुभ मेहता यांची या विषयी अमेरिकास्थित आशुतोष हडप या मित्राशी चर्चा झाली. हडप यांचा अकरा वर्षीय मुलगा अमेयला ही बाब समजल्यावर त्याने कुटुंबीयांसोबत वाघेरास्थित आश्रमशाळेला भेट दिली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करताना रात्री कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे प्रकर्षांने पुढे आले. वसतिगृहात सौर ऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मुले-मुली रात्रीच्या वेळी अभ्यास करू शकतील. अंधारात आसपास वावरताना वाटणाऱ्या अनामिक भीतीचे सावट दूर सारले जाईल. हे लक्षात घेऊन अमेरिकेला परतल्यावर अमेयने या प्रकल्पासाठी निधी संकलनास स्वत:पासून सुरुवात केली. सहकारी मित्रांनी त्याला मदतीचा हात दिला. जवळपास ७७ हजार ५०० रुपये जमवून अमेयने ही रक्कम रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाकडे पाठविली. या कामासाठी त्याची अस्वस्थता लक्षात आल्यावर माजी विद्यार्थी संघाचा हुरूप वाढला. संघाने सदस्य तसेच आप्त मित्रांना या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले. त्यास सर्वानी प्रतिसाद देऊन प्रकल्पासाठी पावणे दोन लाखाचा निधी संकलीत केला.
या प्रकल्पासाठी जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, ‘रचना’मधील माजी विद्यार्थीनी केतकी येवले (धामणे) यांचे पती उदय येवले यांच्या सहकार्यामुळे सोलरिका कंपनीने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम अतिशय कमी खर्चात पूर्णत्वास नेले. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण वसतिगृह सौर दिव्यांनी प्रकाशमान झाले आहे. वसतिगृहातील मुले व मुलींच्या खोल्या, व्हरांडय़ातील मोकळी जागा, प्रसाधनगृह अशा एकूण ३० ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे कार्यान्वित करण्यात आल्याचे संघाचा सदस्य पूर्वेश बागूल यांनी सांगितले. या भागात रात्री वीज कधीही अंतर्धान पावत असल्याने विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे अवघड जात होते. दुपारी वीज गेली की, अंधार पडण्यापूर्वी त्यांच्या भोजनासह खोल्यांमध्ये झोपण्याची तयारी करून ठेवणे क्रमप्राप्त ठरत होते. इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण घेणारे जवळपास ५०० विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वसतिगृहात प्रकाश व्यवस्था आवश्यक होती. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्व अडचणींवर तोडगा निघाल्याचे मुख्याध्यापक नितीन पवार यांनी नमूद केले. लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी रचना विद्यालयातील १९९२ च्या तुकडीतर्फे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चादर व सतरंजीचे वितरण करण्यात येईल. या वेळी रचनातील माजी विद्यार्थ्यांच्या गायनाचा कार्यक्रमही होणार आहे. या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या घटकांचा आदिवासी विद्यार्थ्यांशी कायमस्वरूपी ऋणानुबंध जोडले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा