नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शितल मोरे यांच्या मृत्युला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीने गुरूवारी संदर्भ रुग्णालयात आंदोलन केले. या आंदोलनानंतर परिचारिकेस निलंबित करण्यात आल्यावर या निर्णयाविरोधात दुपारी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले.
जानेवारीत शितल मोरे यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अचानक त्यांच्या पोटात दुखु लागले. परिचारिका आणि कक्षसेवकास सांगूनही त्यांनी योग्य ती मदत, उपचार केले नाहीत. यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, रुग्णालय व्यवस्थापनाने चौकशी समिती स्थापन करण्याचे ठरवले. समितीने सीसीटीव्ही चित्रण तपासून डॉक्टर, परिचारिका आणि कक्षसेवक यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. या अहवालाच्या आधारे संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी आरोग्य उपसंचालक, सरकारवाडा पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे बहुजन युवा आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
कारवाई होत नसल्याने गुरूवारी संदर्भ रुग्णालयासमोर वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलन केले. संबंधितांना तत्काळ बडतर्फ करावे, शितलच्या मुलीच्या शिक्षणाची आणि पुढील भविष्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत आरोग्य उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, आरोग्य उपसंचालकांकडून संबंधित अधिपरिचारिकेवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. परिचारिकेचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी गुरूवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि कक्षसेवक एकत्र आले. आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या वतीने निदर्शने करत काम बंद आंदोलन करण्यात आले. उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात बाजू मांडण्यात आली. कारागृहात बंदिस्त तसेच खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयितांच्या सांगण्यावरुन अधिपरिचारिकांचे निलंबन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न करण्यात आला. कुठलाही आरोप सिध्द झालेला नसतांना एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाची कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येत असून नुकसानीला आरोग्य उपसंचालक कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.