गणरायाच्या नैवेद्यासाठी वैविध्यपूर्ण मोदकांसह चॉकलेट्सचे विविध प्रकार बाजारपेठेत दाखल झाले असून ग्राहक आणि भाविकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उकडीचे, तळणीचे, पुरणाचे, चॉकलेटचे आणि मिठाईचे मोदक असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच विविध स्वादातील चॉकलेट्सनाही चांगली मागणी आहे.
अनेक नोकरदार महिलांनी उकडीचे घरगुती मोदक बनवून देणाऱ्या व्यावसायिकांकडे आगाऊ नोंदणी केली असून यंदा ३० रुपयाला एक अशी उकडीच्या मोदकाची किंमत आहे. मिठाई प्रकारातील अंजीर, काजू, मोतीचूर, मावा, पान, खोबरं या मोदकांनाही मोठी मागणी आहे. रंगीत बुंदी, खुर्चन वडी, अंगुरमलई, रसमलई, गुलाबजाम, श्रीखंड, अंजीर बर्फी, काजू कतली, पेढे या पदार्थानीही ग्राहकांची पसंती मिळविली आहे. २०० ते ८०० रुपये किलो या दरम्यान मिठाईची विक्री होत असून मधुमेही रुग्णांसाठी खास ‘साखरमुक्त’ मिठाई बाजारात दाखल झाली आहे. अनेक ग्राहकांचा कल ही मिठाई घेण्याकडे असल्याचे अजय सोलंकी या विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
गणपतीपाठोपाठ येणाऱ्या गौरींच्या स्वागतासाठीही मिठाईसोबतच चटपटीत फरसाण, नमकीन यांचे वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध आहेत. मक्याचा चिवडा, महालक्ष्मी चिवडा, डाएट चिवडा, शंकरपाळे, कचोरी, वेफर्स, बासमती चिवडा यांना विशेष मागणी आहे. मोदक रूपातील सुकामेव्याचे डबे, कलात्मक मिठाईचे डबे गणेशासमोर सजावट म्हणून ठेवण्यासाठी ग्राहक खरेदी करत असल्याचे पाहायला मिळाले. पनीर आणि खवा या पदार्थाना आगाऊ मागणी असल्याचे मिठाई विक्रेते सोहन देवासी यांनी सांगितले.
रविवारी येणाऱ्या हरतालिकेसाठी महिलावर्गाकडून शेवंती, गुलाब, झेंडूची फुले, श्रीफळ, हरतालिकेची मूर्ती, करंडा, सुपारी, हिरव्या बांगडय़ा, बेलाची फळे यांना तर गणपती-गौरीच्या सजावटीसाठी ऑर्किड फुलांना यंदा मागणी आहे.