नाशिक : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शिरवाडे (वणी) गावाला राज्यातील कवितेच्या गावाचा सन्मान यासह शिक्षकांचा गौरव, काव्य मैफल, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने राज्यातील कवितेचे दुसरे गाव म्हणून कुसुमाग्रजांचे जन्मगाव असलेल्या निफाड तालुक्यातील शिरवाडेची ओळख निर्माण करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि शिरवाडे (वणी) ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गुरूवारीआयोजित कार्यक्रमात मराठी भाषा तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे यासंदर्भातील औपचारिक घोषणा करतील. गावात कवितांची १५ दालने साकारण्यात येतील. उद्घाटन सोहळ्यात एक दालन खुले होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कुसुमाग्रजांच्या साहित्यांच्या अनुषंगाने उर्वरीत दालने सुरू केली जातील. स्थानिक कवी, साहित्यकांच्या साहित्याचा अंतर्भाव त्यात केला जाणार आहे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या दृष्टीकोनातून प्रयत्न होणार आहेत.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवारी सकाळी आठ वाजता टिळकवाडी येथे कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी नाशिककर आणि प्रतिष्ठानचे सभासद, विश्वस्त एकत्र येणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने वाटेवरच्या सावल्या कार्यक्रम होणार आहे. यामध्ये चिन्मय केळकर, सदानंद जोशी, दत्ता पाटील, हेमंत महाजन, श्रध्दा पाटील सहभागी होणार आहेत.

नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिरवाडे (वणी) येथील हॉटेल दौलत फुड मॉल येथे कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान सोहळा होणार आहे. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित राहणार आहेत

कुसुमाग्रज स्मरण

कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत एक ते नऊ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी सहा वाजता वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशी किरण पुरंदरे यांचे निसर्ग आणि मनुष्य, दुसऱ्या दिवशी सौमित्र आणि सौमित्र हा किशोर कदम-सौमित्र पोटे यांचा कार्यक्रम होईल. तीन मार्च रोजी जीवनलहरी काव्यसंध्या हे काव्यसंमेलन, चार रोजी सचिन शिंदे दिग्दर्शित दगड आणि माती नाट्यप्रयोग, पाच रोजी रागिनी कामतीकर यांचा शब्द स्वरांच्या मैफलीत, सहा रोजी सानेगुरूजींच्या विचारांचा मागोवा अभिवाचन- बलसागर भारत होवो, सात रोजी शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचे गायन व पारितोषिक वितरण,आठ रोजी प्रगती बाणखेले यांचे शेजारच्या महिला या विषयावर व्याख्यान आणि नऊ मार्च रोजी आदित्य कल्याणपूरकर यांचा तालयात्रा कार्यक्रम होणार आहे. १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता गुरूदक्षिणा सभागृहात जनस्थान पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

Story img Loader