मूर्तीच्या किमतीत २० टक्के वाढ * विविध रूपांतील गणेशमूर्तीना मागणी
नाशिक : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम सर्वत्र दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून नोंदणी करण्यात आलेल्या गणपती मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यासाठी तसेच मंडळांच्या सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार, कारागीर यांनी आता दिवसरात्र एक केला आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत यंदा ३० टक्क्य़ांनी वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतीतही दरवर्षीपेक्षा २० टक्के वाढ झाली आहे.
वेगवेगळ्या आकर्षक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. बच्चेकंपनीचा हट्ट पुरवत अनेकांनी माय फ्रेंड गणेश, बालगणेश, डमरूवर बसलेला गणपती, मोदक खाणारा गणपती अशा कलात्मक रूपातील गणेशमूर्तीना पसंती दिली आहे. कृष्ण, शंकर यांच्या रूपातील निळ्या रंगाच्या मूर्तीना तरुणांकडून मागणी आहे. तसेच ‘लालबागचा राजा’, ‘चिंचपोकळीचा राजा’, टिळक गणेश, ब्राह्मण बैठक गणेश, दगडूशेठ गणपती, कुमकुम गणेश, सावरकर बैठक या पारंपरिक रूपातील मूर्तीना मध्यमवर्गाची पसंती आहे. ‘बाहुबली’, सिंहासनावर विराजमान गणपती, ग्रंथ लिहिणारा, पेटीवादन करणारा गणपती अशा मूर्तीही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. ‘संभाजी’ मालिकेच्या प्रसिद्धीमुळे सिंहाशी झुंज देणाऱ्या राजे संभाजी यांचे प्रतीकात्मक रूप ‘छत्रपती संभाजी गणेश’मूर्तीतून पाहण्यास मिळत आहे. विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्ती यंदा बाजारात नवीन असून भाविकांच्या पसंतीस उतरताना दिसते. तसेच चकचकीत ‘मार्बल फिनिश’ असलेल्या मूर्तीना मंडळांकडून मोठय़ा प्रमाणात नोंदणी झाली आहे. यंदा श्ॉडो प्रकारच्या दोन रंगात असणाऱ्या गणेश मूर्ती खरेदीकडे विशेष कल असल्याचे गणेशमूर्ती विक्रेते तेजस तायडे यांनी सांगितले. या मूर्तीची किंमत ५०० ते ८००० रुपये अशी असून, घरगुती पूजेकरिता एक ते दीड फुटी मूर्तीना मागणी आहे. यंदा अनेक गणेश मंडळांनी पूरग्रस्तांना मदत केल्याने मूर्तीच्या खर्चात कपात केली आहे. त्यामुळे मंडळांकडून मोठय़ा मूर्तीची मागणी घटली असल्याची माहिती विक्रेत्या भारती सोनवणे यांनी दिली.