अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित अंकुर चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी प्रसिध्द माहितीपट आणि चित्रपट निर्माती निष्ठा जैन यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी माहितीपटाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला.
अंकुरच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या सिग्नेचर फिल्म स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जयेश आपटे दिग्दर्शित आणि निर्मित दैनंदिन व्यवहारातील दुर्लक्षित घटक माहितीपटासाठी मान मिळविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विजेती सिग्नेचर माहितीपट आणि प्रसिध्द ‘गुलाबी गँग’ माहितीपट दाखविण्यात आला.
सकाळी अकरा वाजता माहितीपटाच्या सादरीकरणाला सुरूवात झाली. यावेळी पहिली नाशिक येथील बनलेली कावळा हा माहितीपट सादर झाला. त्यात अंधश्रध्दा आणि चुकीच्या धार्मिक रुढींवर भाष्य केले गेले. एका बाजुला भुकेने कासावीस लहान मूल तर दुसरीकडे पिंडदान करण्यासाठी कावळ्याची वाट पाहणारी माणसे दाखविण्यात आली. ‘काव्यकल्लोळ’ यामधून नवीन प्रयोग केला असून कविता ऐकवत प्रेम समजून सांगितले आहे. रासायनिक खते कसा जमिनीचा कस घालवतात आणि शेतकरी कसा फसविला जातो हे वास्तव दाखवून केवळ भारतात दरवेळी एक लाख टन पेस्टीसाईड वापरले जाते हे वास्तववादी चित्रण दाखविले आहे. नववर्ष म्हणजे केवळ मजा नाही हे ‘मिशन ३१ स्ट’ माहितीपटावरून दाखविण्यात आले. त्यात नांदगाव येथील तरूण गरीबांना उबदार कपडे वितरित करून नववर्ष साजरे करतात हे दाखविण्यात आले. ‘रक्तानुबंध’ हा सिकलसेल आजारावर आधारीत माहितीपट. हा रोग कसा होतो, तो अनुवांशिक असून त्याची लक्षणे काय आहे तर राज्यातील अनेक भागात हा रोग आढळून येत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ‘बालविवाह’मध्ये लहान वयात होणारे लग्न हा विषय हाताळण्यात आला असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारत यासाठी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘उष:काल होता होता’ या माहितीपटात एचआयव्हीने बाधीत झालेल्या मुलाच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता माहितीपट दाखविण्यास सुरूवात होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
महोत्सवाचा समारोप रविवारी प्रसिध्द माहितीपटकार आणि कलावंत शबनम विरमणी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचा पुरस्कारप्राप्त हद-सरहद माहितीपट दाखविला जाईल. त्यानंतर विरमणी यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जागतिक किर्तीच्या माहितीपटकारांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच मॉलीवूडवरही चर्चा होणार आहे.