मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी..जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ चा जयघोष करीत बुधवारी जागतिक मराठी दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांसह काही सामाजिक संस्थांच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधत विचार मंच, हस्तलिखित प्रकाशन, स्पर्धा अशा विविधांगी कार्यक्रमांची आखणी करत मराठी दिनाचे पैलू उलगडले.
‘कुसुमाग्रज मराठी विचार मंच’स्थापन
मराठी प्रेमींच्या सहकार्याने ‘कुसुमाग्रज मराठी विचार मंच’ स्थापन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा वापर अधिकाधिक आणि गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी मंचच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कला क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी प्रयत्न करत असतांना विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी मंचच्या माध्यमातून काही स्पर्धा, संगणकीय उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती मंचचे प्रवर्तक सतीश बोरा यांनी दिली. तसेच राज्यात ठिकठिकाणी मंचच्या वतीने संपर्क साधत प्रकाशकांना ‘कुसुमाग्रज दालन’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्यप्रेमी नाशिककरांनी उपक्रमात सहभागी होण्यासाठी ०२५३-२५९८४८०, ९३७३९००४२५ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हस्तलिखिताचे प्रकाशन
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांंनी पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्यावर ‘त्रिवेणी संगम’ तसेच ‘मराठी विश्वकोश’, ‘शब्द कोश’, ‘सांस्कृतिक कोश’ यावर आधारित ‘मैत्री विश्वकोशाची’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक आणि साहित्यिक नरेश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, पर्यवेक्षक मदन शिंदे, रेखा हिरे, शिक्षक प्रतिनिधी त्र्यंबक साळुंके, कार्यक्रम प्रमुख शारदा थोरात उपस्थित होत्या. पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे वर्षभर शाळेने या त्रिमूर्तीना समर्पित कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शाळेच्या गीत मंचाच्या विद्यार्थ्यांंनी ग.दि.माडगूळकर यांचे गीत सादर केले. संध्या आहेर यांनी मार्गदर्शन केले होते. ओम करलकर, सिद्धेश काकडे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील अंतू बरवा आणि नारायण या पात्रांचे विनोदी किस्से नाटय़मय स्वरुपात मांडले. सुभाष लाड यांनी मराठी भाषेची माहिती सांगितली. मराठी भाषेवर अन्य भाषेचा प्रभाव होऊ न देण्यासाठी व्यवहारात मराठी भाषेचा आवर्जून वापर करावा, असे आवाहन महाजन यांनी केले. ग्रंथपाल विलास सोनार यांनी शासनाने यावर्षीचा मराठी भाषा दिन हा मराठी म्हणी, युनिकोड मराठी टंकलेखनाचा वापर, मराठी कोश वाचन, मराठी सुलेखनाचा सराव यासाठी समर्पित केल्याचे नमूद केले. अध्यक्ष जयंत मोंढे यांनी सर्वानी मराठी भाषेचा सन्मान करण्याची सूचना केली. सूत्रसंचालन संयुक्ता कुलकर्णी यांनी केले.
शिशुविहार आणि बालकमंदिरात ग्रंथपूजन
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित शिशुविहार आणि बालकमंदिर इंग्रजी विभागाच्या वतीने मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील अतिप्राचीन ग्रंथ रामायण, भगवद्गीता, संत साहित्य, धार्मिक ग्रंथ आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याची माहिती देत मराठी भाषेचे विविध पैलु उलगडले. मराठी साहित्यातील प्रार्थना, भक्तीगीते, बडबडगीते, बालगीतांसह एकपात्री प्रयोग, बोधकथा, गवळण, कविता, भजन यासह मराठी भाषेचे गौरव गीत सादर करण्यात आले.
पेठे विद्यालयात ग्रंथदिंडी
रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात मराठी दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत लेझीम तसेच ढोल ताशाच्या गजरात ग्रंथसाहित्याची दिंडी काढली. मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील उपस्थित होते. कीर्ती महालेने ‘नटसम्राट’मधील स्वगत सादर केले. विद्यार्थ्यांनी लाभले आम्हांस भाग्य हे गीत सादर केले. हर्षल कोठावदे यांनी मराठी साहित्याविषयी चर्चा केली. विकास खंबाईत यांनी मराठी भाषेचे महत्व विविध उदाहरणातून पटवून दिले. उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे यांनी कुसुमाग्रजांचा जीवनपट सांगितला.
जाधव यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अजून प्रयत्न झाले पाहिजेत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजश्री मुळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र कापसे यांनी आभार मानले.
पंचवटी वाचनालयात म्हणी स्पर्धा
अॅड. उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘मराठीतील म्हणीचे जतन आणि संवर्धन’ या संकल्पनेनुसार परिसरातील शाळांमधून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘म्हणी पूर्ण करा’ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना वाचनालयाचे कार्यवाह नथुजी देवरे, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे, नगरसेवक गुरूमित बग्गा, प्रकाश वैद्य यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
नाशिकरोड महाविद्यालयात ‘सांस्कृतिक गंगेचा जागर’
नाशिकरोड महाविद्यालयात भारूड, ओव्या, लोकगीत, जोगवा, कविता आदींच्या माध्यमातून मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लोककला आणि अभिनयातून मराठी भाषेच्या सांस्कृतिक गंगेचा जागर केला. शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा ‘हा दगड फुलांचा मर्द मराठी देश कणी कोंडा खाया अंगी फाटका वेश’ हा पोवाडा सोमनाथ आहिरे याने सादर केला. नटसम्राटमधील स्वगत साहिल सोनवणेने म्हटले. गायत्री हरळे हिने मराठीची थोरवी कीर्तनातून मांडली. स्त्रियांचे प्राकृत काव्य, गोंधळ असे विविध लोककला प्रकार सादर करण्यात आले.
प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांनी मराठीतील म्हणी सादर करीत ‘चला मराठी म्हण जपू या, मराठीचे धन जपू या, मराठीचे मन जपू या’ असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.प्रमुख पाहुणे उन्मेष गायधनी यांनी मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी कार्यक्रमात पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले.