नाशिक : देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २८ डिसेंबर रोजी शहरात येणार असल्याने पालिका प्रशासनातर्फे शहरात राज्यपालांच्या स्वागतासाठी विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. जय्यत तयारी केली जात आहे. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता देवमामलेदार  स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनानंतर देवमामलेदार मंदिराजवळ असलेल्या दगाजी चित्रपटगृहात मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच जणांना प्रवेश देण्याबाबत पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार बांगर, तहसीलदार जितेंद्र इंगळे, नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उबाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर  वीज वितरण उपविभागीय अभियंता बोरसे आदींनी प्रत्यक्ष स्मारक परिसर, तसेच समारंभ स्थळाची पाहणी केली.

राज्यपाल कोश्यारी यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून हेलिपॅड स्थळी भेट देऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यपालांसोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत, निवास, भोजन आदींबाबत विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. हेलिपॅड ते समारंभस्थळापर्यंत राज्यपालांचा ताफा राज्य महामार्ग आणि शहरातील रस्त्यांनी जाणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. कार्यक्र मादरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याची सूचना वीज वितरण अधिकाऱ्यांना  करण्यात आली. देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, स्मारक तसेच दगाजी चित्रपटगृह परिसराची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात कडेकोट  पोलीस बंदोबस्त आहे.

 

 

Story img Loader