पं. शंकरराव वैरागकर संगीत पतिष्ठानतर्फे आयोजन
नाशिक : शहरातील पंडित शंकरराव वैरागकर संगीत पतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्यात मोहनवीणाचे जनक पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट यांचे वीणावादन हे मुख्य आकर्षण असून त्यांना बनारस घराण्याचे तबलावादक अभिषेक मिश्रा हे साथसंगत करणार आहेत.
महाकवी कालिदास कला मंदिरात हा कार्यक्रम होणार असून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने दर वर्षी गुरुवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे १९ वे वर्ष आहे.
विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणा या वाद्याची झलक आणि दिल्ली येथील उदयोन्मुख कलाकार बनारस घराण्याचे अभिषेक मिश्रा यांची जुगलबंदी हे या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. या वाद्यावर शास्त्रीय रागदारी आणि उपशास्त्रीय ठुमरी यांचे सादरीकरण यांची मजा काही औरच आहे. पं. सुरेन्द्र मोहन मिश्रा यांचे ते शिष्य आहेत. स्थानिक युवा गायक अथर्व वैरागकर, सागर कुलकर्णी आणि पंडित वैरागकर यांचे काही युवा शिष्य प्रायोगिक रागमालाने कार्यक्रमाची सुरुवात करतील. गुरुवंदनेच्या परंपरेनुसार प्रसिद्ध गायक तथा गुरुवर्य शंकरराव वैरागकर यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. संपूर्ण सोहळ्यात ओंकार वैरागकर (तबला), कृष्णा बैरागी, आनंद अत्रे आणि सागर कुलकर्णी (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, ग्लोबल व्हिजन शाळेचे सचिव शशांक मणेरीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विजयालक्ष्मी मणेरीकर, सरिता वैरागकर आदींनी केले आहे.
पं. विश्वमोहन भट यांनी मोहनवीणेचा शोध लावला. मोहनवीणेच्या अनेक तारांच्या कंपनांतून निर्माण होणारा ‘रेझोनन्स’ आणि त्याची खासीयत तसेच सतार, गिटार, सरोद आणि व्हायोलीन यांचे वेगळेपण एकत्रितपणे या वाद्यातून निर्माण होते. हा प्रयोग नावीन्यपूर्ण आहे. ८८ देशांमध्ये प्रवास करून आपली कला सादर करणाऱ्या भट यांना पद्मश्री, पद्मभूषण तसेच परदेशातील प्रतिष्ठेचा ग्रॅमी सन्मानही प्राप्त झाला आहे.