नाशिक बाजार समितीतून मात्र मुंबईकडे सुरळीत वाहतूक

माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला गेला नसल्याची तक्रार करीत महामार्गावर ओझरजवळील गरवारे पॉइंट येथे भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जिल्ह्य़ातही इतर बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प असले तरी नाशिक बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. या बाजार समितीतून मुंबईसह उपनगरांमध्ये दुपापर्यंत ७६ वाहनांमधून भाजीपाला पाठविण्यात आला. नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. यामुळे भाजीपाला फेकून ज्या मुद्यावर आंदोलन केले, त्यात तितकेसे तथ्य नसल्याचे उघड झाले.

मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. संपामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, चांदवड, उमराणे बाजार समित्यांचे कामकाज बुधवारीही विस्कळीत राहिले. ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये मुख्यत्वे कांद्याचा लिलाव होतो. त्या ठिकाणी माथाडी कामगारांची संख्या अधिक आहे. नाशिक बाजार समितीत प्रामुख्याने भाजीपाल्याचा लिलाव होतो. या बाजारात माथाडी कामगारांची संख्या कमी आहे. यामुळे माथाडींच्या संपाचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला नाही. उलट संपकाळात मुंबईसह उपनगरात जादा संख्येने वाहने गेली आहेत. या स्थितीत वाशी बाजार समिती बंद असल्याने शेतातून काढलेला कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल आदी भाजीपाला वाशी बाजारात जाणार नसल्याची माहिती समजल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत सकाळी साडेअकरा वाजता गरवारे पॉइंट येथे धाव घेतली. भाजीपाला रस्त्यावर फेकत रास्तारोको आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासन तसेच व्यापाऱ्यां विरोधात घोषणाबाजी करीत नुकसान भरपाईची मागणी केली.

माथाडी कामगारांच्या संपामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेशगाव, शिवणगाव, नाशिक तालुक्यातील ओझरखेड, राजेवाडी, पिंपळगाव, गंगाम्हाळुंगी आदी गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. व्यापाऱ्यांनी माथाडी कामगारांच्या संपाबाबतची माहिती न दिल्याने मोठे नुकसान झाले. त्यास व्यापारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मुंबई, उपनगरांमध्ये भाजीपाला रवाना

नियमन मुक्तीच्या निर्णयामुळे भाजीपाला मुंबईसह उपनगरांमध्ये थेट नेता येतो. पूर्वी वाशी बाजार समितीत भाजीपाला नेणाऱ्या वाहनांची नोंद करावी लागायची. आता तसे बंधन नाही. वाशी बाजार समितीत लिलाव बंद असले तरी मुंबईतील दादर, माटुंगा आणि इतर उपनगरांमध्ये भाजीपाला नियमितपणे पाठविला जात आहे. बुधवारी सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत ७६ वाहने भाजीपाला घेऊन गेल्याची नाशिक बाजार समितीत नोंद आहे. जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होतात. तिथे माथाडी कामगारांची संख्या अधिक आहे. यामुळे त्यांचे व्यवहार थंडावले. नाशिक बाजार समितीत माथाडी कामगारांची संख्या मुळात कमी आहे. या बाजारात मुख्यत्वे भाजीपाल्याचा लिलाव होतो. भाजीपाला घेऊन जाणारी वाहने कुठेही रोखल्याच्या तक्रारी नाहीत.

– अरुण काळे (सचिव, नाशिक बाजार समिती)

Story img Loader