नववर्षांच्या स्वागताचा उत्साह ओसंडून वाहत असताना त्यास नवीन सिडको भागालगत मध्यरात्री झालेल्या दुचाकी जाळपोळीच्या घटनेने गालबोट लावले. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून संशयितांनी दुचाकी वाहने जाळली. या आगीची झळ घरासही बसली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असून हा टोळीयुद्ध वा घर पेटविण्याचा प्रकार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कामटवाडे लिंक रोडवर बंदावनेनगर परिसरातील रो-हाऊसमध्ये हा भयावह प्रकार घडला. या ठिकाणी रमेश दळवी आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. रो-हाऊसमधील नागरिकांनी ‘थर्टी फर्स्ट’ एकत्रित साजरा केल्यानंतर सर्व जण झोपी गेले. मध्यरात्री उशिरा सामसूम झाल्यानंतर संशयितांनी दळवी यांच्या घरासमोर उभ्या असणाऱ्या तीन दुचाकी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आग पसरल्यानंतर पेट्रोल टाक्यांचा स्फोट होऊन दुचाकी भस्मसात झाल्या. बाहेर आग व धूर दिसत असल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करत सर्वाना जागे केले आणि आग विझविण्याचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत दुचाकीचे नुकसान झाले होते.

आगीत दळवी यांच्या घरातील दर्शनी खोलीचे प्रचंड नुकसान झाले. घरातील लाकडी सामानाने पेट घेतल्याने मदतकार्यात काही काळ अडथळा आल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. या गोंधळात रमेश दळवी आणि पत्नी शोभा जखमी झाल्या.

या प्रकाराला दळवी यांचे काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यंत्रणेने तपासचक्र वेगात फिरवत राहुल गोतीशे, योगेश पाटील, विजय काचे व पंकज सोनवणे यांना अटक केली.

दरम्यानच्या काळात तक्रारदाराची पाश्र्वभूमी तपासली गेली. त्यात त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, शहरात पूर्ववैमनस्य वा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने वाहन जाळपोळीचे अनेक प्रकार याआधी घडले आहेत. टवाळखोर व गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्यामुळे वारंवार या घटना घडत असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

 

Story img Loader