मालेगाव : मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या वाहनावर दोन मोटारीतून आलेल्या संशयित गोवंश तस्करांनी हल्ला करण्याचा प्रकार गुरुवारी मालेगाव-सटाणा रस्त्यावरील टेहरे चौफुली भागात घडला. या घटनेत तिन्ही वाहने दुभाजकावर आदळल्याने आविष्कार यांच्या चालकासह चार जण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आविष्कार हे मित्रांसह दाभाडी शिवारातील चिंतामणी गणेश मंदिरात दर्शन घेऊन पहाटे वाहनातून मालेगावकडे परतत होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारीतून जनावरांची तस्करी होत असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी संशयास्पद मोटारीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या इतर दोन मोटारींनी आविष्कार यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयितांनी आरडाओरड करत आविष्कार यांच्या चालत्या वाहनाच्या पुढील भागावर सळईने वार केले.
हेही वाचा…मुंबईतील बोट अपघातातील मृतांमध्ये पिंपळगावच्या तिघांचा समावेश
वार चुकविण्याच्या प्रयत्नात चालक कृष्णा पाटील याचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळल्याने टायर फुटले. कृष्णा हा किरकोळ जखमी झाला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या संशयितांच्या दोन्ही मोटारीही दुभाजकावर आदळल्याने त्यातील चौघे जण जखमी झाले. अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे काही संशयितांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यावर छावणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयितांच्या वाहनांमध्ये दोरखंड वगैरे साहित्य आढळून आल्याचे सांगण्यात आले. चालक कृष्णा आणि संशयितांच्या वाहनांमधील जखमी चौघे अशा पाचही जणांना एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यावर घरी सोडण्यात आले