नाशिक – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने मोटारचालकावर दंडात्मक कारवाई करत असताना वाहनधारकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. इ चलान यंत्र हिसकावून नोकरी घालविण्याची धमकी दिली. शहरातील मेहेर सिग्नल भागात हा प्रकार घडला.
याबाबत वाहतूक शाखेचे हवालदार अरूण चव्हाण यांनी तक्रार दिली. चव्हाण हे रविवारी दुपारी मेहेर सिग्नल थांबा येथे कार्यरत असताना महात्मा गांधी रस्त्याने सीबीएसच्या दिशेने स्मार्ट रोडवर वळण घेताना मोटारचालक भ्रमणध्वनीवर बोलताना दिसला. हवालदार चव्हाण यांनी मोटार रोखली. दंडात्मक कारवाईची तयारी सुरू केली. चव्हाण यांनी इ चलान यंत्राद्वारे मोटारीचे छायाचित्र काढल्यानंतर चालकाने वाद घातला. दंडात्मक कारवाईस विरोध करत वाहनधारकाने चव्हाण यांच्या् हातातील इ चलान यंत्र हिसकावून घेतले. छायाचित्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तुझ्यासारखे १० पोलीस घरी बसवेल, अशी धमकी देत पलायन केले. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी शहरात वाहनधारक, रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याचे प्रकार घडले आहेत. रिक्षाचालक तर वाहतूक पोलिसांना अजिबातच जुमानत नाहीत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाईची गरज व्यक्त होत आहे.