नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांकडून घाट मार्गात उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारा अपघाताचा धोका लक्षात घेऊन त्यांना प्रतिबंध करण्यासाठी अशा काही ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचा विचार राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचआय) करत आहे. घाटात तीव्र उतार असल्याने वळणालगतच्या क्षेत्रात ना वाहनतळ क्षेत्र आहे. परंतु, पर्यटक नियम पाळत नाहीत. प्राधिकरणाच्या गस्ती पथकाला जुमानत नाहीत. कधीकधी त्यांना धक्काबुक्की करतात. कसारा घाटात तीव्र उताराच्या मार्गावर वाहने थांबवू नयेत, यासाठी पोलिसांच्या सहकार्याने प्राधिकरण अतिरिक्त दक्षता घेणार आहे.

महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवारी ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने पाच मोटारींना धडक दिल्याने १३ प्रवासी जखमी झाले होते. या अपघातात पाच गाड्यांचे नुकसान झाले होते. घाटातील धबधबा पॉइंटजवळ ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील पाच मोटारींना धडक देत तो उलटला. अपघातग्रस्त मोटार खासगी क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली होती. पावसाळ्यात कसारा घाटात कोसळणाऱ्या धबधब्यांचे विलोभनीय दृश्य सर्वांना आकर्षित करते. इगतपुरी तालुक्यात पाऊस सुरू असल्याने कसारा घाटात ठिकठिकाणी धबधबे कोसळू लागले आहेत. या धबधब्याखाली भिजण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी उत्साही पर्यटक वाहने मध्येच उभे करीत असल्याने अपघात होत आहेत.

हेही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

पावसाळ्यात ढगांमुळे घाटात दृश्यमानता अतिशय कमी असते. यात तीव्र उताराच्या रस्त्यालगत वाहने उभे करणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते. घाटात अशा ठिकाणी वाहने उभी करू नयेत म्हणून ना वाहनतळ क्षेत्राचे फलक लावलेले आहेत. परंतु, वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने घाट मार्गात अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणचे अधिकारी भाऊसाहेब साळुंके यांनी सांगितले. ज्या ठिकाणी वाहने थांबतात, तिथे लोखंडी जाळ्या बसविल्या जातील. जेणेकरून वाहनधारकांनी घाटात विनाकारण थांबू नये, असा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर लगत वा इतरत्र धबधब्यांकडे जाताना प्रमुख राष्ट्रीय महामार्ग वा तीव्र उताराचा घाट मार्ग नाही. तिथे पर्यटक मोकळ्या जागेत आपली वाहने उभी करून जाऊ शकतात. परंतु, नवीन कसारा घाटात उताराच्या मार्गावर तसे करू नये, हा प्रयत्न आहे.

हेही वाचा :आरक्षण वादावर शरद पवार यांचा मोजक्या नेत्यांशी चर्चेचा पर्याय, छगन भुजबळांची माहिती

पर्यटकांची दादागिरी

कसारा घाटात विनाकारण वाहनधारकांनी थांबू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणचे पथक गस्त घालत असते. धबधबे पाहण्यासाठी वाहने थांबविण्यास आक्षेप घेतल्यावर काही पर्यटक पथकाशी वाद घालतात. कधीकधी धक्काबुक्की केली जाते. पथकातील कर्मचारी साध्या कपड्यात असतात. त्यांना कोणी जुमानत नाही, असे प्राधिकरणकडून सांगितले जाते. पोलीस विनाकारण थांबणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करतात.