नाशिक – सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये ४६ गाव, पाडे दरडप्रवण क्षेत्रात असून तिथे अकस्मात काही आपत्ती ओढावल्यास तातडीने आवश्यक त्या साधन सामग्रीची व्यवस्था करीत आपदा मित्र व संबंधित विभागांमार्फत जलद प्रतिसाद देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात ५०० आपदा मित्र कार्यरत असून कुठल्याही प्रसंगात ते सर्वप्रथम प्रतिसाद देतील. काही दुर्गम भाग संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. तिथे उपग्रह फोनच्या वापराचे नियोजन आहे.
रायगडच्या इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील स्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी कळवणमधील सप्तश्रृंग गड आणि कसारा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. मातीवर वसलेल्या शहरातील काझीगढीही त्याला अपवाद नाही. दरड कोसळल्याने नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. माळीण दुर्घटनेनंतर दरडप्रवण क्षेत्रातील धोके समोर आले होते. तेव्हा अशा ठिकाणी कायमस्वरुपी उपायांवर विचार झाला होता. पण कालांतराने हा विषय मागे पडला. इर्शाळवाडी दुर्घटनेने त्यावर नव्याने विचार विनिमय सुरू झाला आहे. जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ४६ गावे, पाडे दरड प्रवण क्षेत्रात आहेत. प्रत्येक क्षेत्रात माती व खडकाचा पोत वेगळा असतो. त्यामुळे इतरत्र जे घडते, तसेच नाशिकमध्ये होईल असे गृहीत धरता येत नसल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात आले.
दरड प्रवण क्षेत्रात पेठ तालुक्यातील सादडपाडा, बिलकस, बेहडपाडा, कलामपाडा, गोडसवाडा, डेरापाडा, कासारविहार, कडवापाडा, जबळे, दिंडोरी तालुक्यातील रडतोंडी, आवंतवाडी, चंडिकापूर, सुर्वेगड, पिंपळराज, कळवणमधील मांगलीदर, तताणीपाडा, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगांव, तिन्हळ, गांडूळमोकपाडा, आमदर, दिगमे, खर्डे दिगर, उंबरगव्हाण, चोळीचामाळ, हनुमंत माळ, महाल, पायरपाडा, काठरे दिगर, बोरदैवत, देरगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, सप्तश्रृंगीगड, मेहदर, मुळाणेवणी, वडाळे, पिंपरी मार्केड, कातळगांव, पाळे पिंप्री यांचा समावेश आहे. नाशिक शहरातील काझीगढी आणि इगतपुरी – कसारा घाट यांचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश आहे. सर्वाधिक ३० ठिकाणे कळवणमधील आहेत. पेठमध्ये नऊ, दिंडोरीत पाच, नाशिक एक, इगतपुरी एक अशी ही ठिकाणे आहेत.
या भागात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यात आला. अशा प्रसंगी मातीचे ढिगारे उपसण्यासाठी जेसीबी वा तत्सम यंत्र सामग्रीची गरज भासते. तातडीने ही सामग्री कशी, कुठून उपलब्ध होईल, याची माहिती स्थानिक पातळीवर संकलित केलेली आहे. काही दुर्गम भागात जेसीबी वा तत्सम अवजड सामग्री नेता येणार नाही. तिथे कुठल्या यंत्र सामग्रीचा वापर करता येईल याचाही विचार करावा लागणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्ह्यात ५०० आपदा मित्र कार्यान्वित आहेत. त्यांना आधीच प्रशिक्षण दिलेले आहे. कोणत्याही आपत्तीत सर्वप्रथम आपदा मित्र तात्काळ प्रतिसाद देतील, असे नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महसूल, पोलीस आदींच्या सहाय्याने आपत्ती निवारणार्थ सज्जता राखण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १० उपग्रहाधारित फोन आहेत. संभाव्य आपत्तीत संपर्क व्यवस्थेसाठी त्यांचाही वापर केला जाणार आहे.
हेही वाचा – पंचवटीतील समस्यांप्रश्नी ढोल बजाओ आंदोलन
काझीगढीच्या पाहणीचे निर्देश
शहरातील अमरधाम परिसरात असलेली काझीगढी धोकादायक स्थितीत आहे. या संदर्भात पूर्वी देखील बैठका घेत उपाय योजनेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात अद्यापही नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. या ठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहत असल्यास त्यांना इतरत्र हलविण्याची सूचनाही त्यांनी केली. घटनास्थळी पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.