नंदुरबार हा केंद्र सरकाराने आकांक्षित जिल्हा घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा देणारे डॉक्टर आणि आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>भगिरथ प्रयासमध्ये २०० गावे टँकर मुक्तीचा संकल्प; उत्तम कामगिरी करणाऱ्या गावास १० लाखांचे बक्षिस

शहादा रुग्णालयाचे डाॅ. गावित यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी डॉ. गावित यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षात २०० पेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती आणि टाटा इन्स्टिट्युटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांसाठी स्पीडबोटच्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यकता पडल्यास आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. या सर्व निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसह इतर सुविधांशी वाड्या-पाड्यातला माणूस जोडला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक वाड्या-पाड्यात आणि गावात बारमाही रस्त्यांची निर्मिती येत्या दोन वर्षात केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.उद्घाटन झालेल्या शहादा ग्रामीण रूग्णालयास लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदिवासी भागात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आरोग्य सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्यकर्मी यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचाही विचार सचिवस्तरावरील चर्चेत केला असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या चेहरा वाचनाव्दारे (फेस रिडिंग) हजेरीचा राज्यातील आगळा वेगळा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील कुपोषण व सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी लवकरच महिला बचत गटांचा सहभाग वाढवून त्यासाठीच्या उपययोजना अधिक बळकट केल्या जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील कुपोषणावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शंभर खाटांचे एम्स दर्जाच्या सुविधा देणाऱ्या स्वतंत्र माता व बाल संगोपन रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. करोनाकाळात वैद्यकीय महाविद्यालयास मिळालेली केंद्र सरकारची मान्यता व त्याच कालावधीत शंभर विद्यर्थ्यांच्या प्रवेशासोबतच त्यासाठी भरघोस निधी ही मोठी उपलब्धी असल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य जिजाताई ठाकरे, के.डी. नाईक, गुलाब ठाकरे, राजीव जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijayakumar gavit testimony that health facilities will soon be provided to the villages along narmada banks through speedboats amy