जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ६० लाख रुपयांच्या कामांचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील आणि सहायक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) कल्पेश बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या विभागाच्या जळगाव युनिटने ही कारवाई केली.
हेही वाचा >>> बनावट प्रस्ताव कारवाईप्रश्नी नाशिक मनपा-जिल्हा प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील तक्रारदाराचे वडील सरपंच आहेत. ग्रामपंचायतीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काँक्रिट व पेव्हर ब्लॉकच्या चार कामांसाठी प्रत्येकी १५ लाख यानुसार ६० लाख रुपयांचे काम शासनाकडून मंजूर झाले होते. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी कल्पेश बेलदार याने ग्रामविस्तार अधिकाऱ्यासाठी दोन टक्के व स्वत:साठी एक टक्का अशी तीन टक्के म्हणजे एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली होती. तेव्हा संशयित ग्रामविस्तार अधिकारी पाटीलने सहायक कार्यक्रम अधिकारी बेलदारला प्रोत्साहन दिल्याचे आढळले. तडजोडअंती एक लाख रुपये निश्चित झाले.
हेही वाचा >>> नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा
तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने संशयितांना रंगेहात पकडले. ग्रामविस्तार अधिकारी पाटील व सहायक कार्यक्रम अधिकारी बेलदार यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याचे या विभागाने म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस नाईक किशोर महाजन, बाळू मराठे यांचा समावेश होता.