जळगाव – जिल्हा पोलीस दलातर्फे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात चार गावठी बंदुकांसह पाच तलवारी, दोन चॉपर, चाकू व जिवंत काडतुसे, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का, तडीपारीच्या कारवाया सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक करण्यात आली. स्वप्नील ऊर्फ गोल्या ठाकूर (१९), निशांत चौधरी (१९, दोन्ही रा. शंकररावनगर, जळगाव), पंकज राठोड (१९, रा. तुकारामवाडी, जळगाव), यश शंकपाळ (१९, हरिओमनगर, आसोदा रोड, जळगाव) यांना अटक करण्यात आली. दरोड्याच्या साहित्यासह बंदूक, तीन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले.

हेही वाचा – स्थानिक केंद्र पातळी भक्कम करण्याचे युवक काँग्रेस विभागीय आढावा बैठकीत आवाहन

भुसावळ येथील कारवाईत वाल्मीकनगर परिसरातून ललित खरारे (२२), जितेंद्र बोयत (२३), पवन खरारे (२७ सर्व रा. वाल्मीकनगर, भुसावळ) यांच्याकडून गावठी बंदूक, दोन जिवंत काडतुसे, दोन भ्रमणध्वनी संच, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंडारी (ता. भुसावळ) गावातील मयूर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडून गावठी बंदूक, पाच तलवारी व एक काडतूस जप्त करण्यात आले.

हेही वाचा – मद्यपी युवकांकडून हुल्लडबाजी करत छायाचित्रकारांना मारहाण; गौतमी पाटील म्हणाली, “खरंतर त्या…”

अडावद येथे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील, दीपक शिंदे यांच्या पथकाने बसमधील रमेश भिलाला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी बंदूक, जिवंत काडतूस मिळून आले.