येवल्यात हरणांच्या संरक्षणाची, निफाडमध्ये बिबटय़ापासून स्वसंरक्षणाची समस्या
येवला तालुक्यात हरणांच्या संरक्षणासाठी शासनाने राखीव क्षेत्र घोषित केल्यानंतरही अन्नपाण्याविना सततची होणारी पशुहानी ही चिंतेची बाब ठरली आहे. दुसरीकडे निफाड तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात अलीकडेच तीन जणांना प्राण गमवावा लागल्याने गोदाकाठ दहशतीखाली आहे. या परस्परविरोधी घटनांमुळे एकीकडे ग्रामस्थांना हरणांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत, तर दुसरीकडे निफाड तालुक्यात बिबटय़ापासून रक्षणासाठी त्यांना उपाययोजना कराव्या लागत आहेत.

येवला वनविभागांतर्गत सुमारे १२००० हेक्टर क्षेत्र असून तालुक्यातील ७३७२ हेक्टर क्षेत्र हे उंचसखल भागात आहे. या परिसरात काळवीट, हरणांची संख्या हजारावर आहे. वेगवेगळ्या कारणांनी या वन्य जीवांची हानी होत असल्याने वनविभागाने २४ जून २०१४ रोजी ममदापूर, राजापूर, सोमठाण जोश, देवदरी, खरवंडी आणि रेंडाळे परिसरातील ५४४१ हेक्टर क्षेत्र राखीव वनसंवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर केले. असे केल्याने अपघात, शिकार किंवा पाण्यासाठी विहिरीत पडणे यामुळे होणाऱ्या हरणांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. एप्रिल ते ऑक्टोबर २०१५ या अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत ३० हरणांचा मृत्यू झाला आहे.

वनसंवर्धन राखीव क्षेत्र जाहीर झाल्यानंतरही येथे हरणांसाठी सुविधा नाहीत. गवताची लागवड होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. विभागामार्फत राखीव क्षेत्रात नव्याने कोणतीही पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे हरीण शेतांमधील किंवा पाटबंधारे विभागाने केलेल्या साठवण तलावाकडे पाण्यासाठी धाव घेतात. या तलावांमधूनही लगतच्या शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पाणी उपसा केला जात असल्याकडे नेचर क्लब ऑफ नाशिकने लक्ष वेधले आहे. कोणत्याही सरकारी विभागाने याची दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे वनविभागाने राखीव क्षेत्रात गवताची लागवड न करता सावरगाव या वन क्षेत्रात ५० हेक्टरवर गवताची लागवड केली आहे.
येवला तालुक्यात सहा हजारांवर हरण, काळवीटांचे वास्तव्य असल्याचे प्राणीप्रेमींकडून सांगण्यात येत असले तरी वनविभागाकडून हरणांची संपूर्ण मोजणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. राखीव वन क्षेत्रातील मोजणी पूर्ण झाली असून ती १४९४ पर्यंत आहे. वनविभागाने गत वर्षांत ही मोजणी केली असली तरी हरणांचा संचार संवर्धन क्षेत्राच्या ४५ किलोमीटर परिसरात होत आहे. म्हणजे हरण एक ठिकाणी थांबत नसल्याने राखीव क्षेत्रातील हरणांच्या आकडेवारीबाबत प्रश्न निर्माण होतो.
काही दिवसांपूर्वी मालेगाव येथून आलेल्या शिकारी टोळीस वनविभागाने रंगेहाथ पकडले होते. परिस्थिती संपूर्णपणे प्रतिकूल असतानाही जगण्यासाठी हरणांची धडपड सुरू आहे. हरणांना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वनविभागाकडून सुविधा तर सोडाच, पण हरणांचे ठिकाण, वेळ याबाबत मार्गदर्शनही होत नाही.
येवला तालुक्यात ही परिस्थिती असताना दुसरीकडे निफाड तालुक्यात मुबलक पाणी, ऊस, द्राक्षबागा यामुळे हिरव्यागार झालेल्या गोदाकाठ परिसरात बिबटय़ांची दहशत कायम आहे. यामुळे या परिसरात पशुधनाबरोबर मनुष्यहानीच्या घटनांत वाढ झाली आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१० ते सप्टेंबर २०१५ अखेपर्यंत ६९५ पशुहानीच्या घटना घडल्या असून त्यात गाय, म्हैस, घोडा, बकरी, मेंढी आदी पाळीव प्राण्यांचा समावेश आहे. साडेचार वर्षांत २५ व्यक्तींवर बिबटय़ाने हल्ला केला असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील सात महिन्यांत बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे- १७ एप्रिल रोजी भुसे येथील गणेश कोटे (४), ८ ऑगस्ट रोजी चापडगाव येथील विकी पिठे (१०), १० ऑगस्ट रोजी परी पिठे (७) यांना प्राण गमवावे लागले. यानंतरही सिन्नर, निफाड, येवला या तालुक्यांमध्ये बिबटय़ाचे दर्शन होत आहे. सध्या जिल्ह्य़ात १०० पेक्षा अधिक बिबटे असल्याचा अंदाज वनक्षेत्र अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. येवला, निफाडचे वनक्षेत्र अधिकारी बी. आर. ठाकरे यांनी अलीकडे घडलेल्या मनुष्यहानीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांना वाद्य वाजवून ऊस तोड करण्याचा सल्ला दिला आहे.
एकीकडे हरणाचा मृत्यू तर दुसरीकडे पशुधन आणि मनुष्यहानीच्या गंभीर घटना वारंवार घडत आहेत. हिंस्र प्राण्यापासून वाचण्यासाठी वाद्य वाजवणे, सावध राहणे, हिंस्र प्राण्यांचा पाठलाग न करणे, मुलांना एकटे सोडू नये, अंधारात एकटे फिरू नये, बिबटय़ा दिसल्यास हातवारे करावेत, जोरजोरात ओरडावे, बोलत राहाणे, रेडिओचा आवाज वाढविणे असे उपाय वनविभागाकडून सुचविण्यात आले आहेत.
गाय, बकरी, डुक्कर यांसह कुत्रा बिबटय़ास आकर्षित करत असतो. त्यामुळे कृत्र्याचेही संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर आली आहे.

Story img Loader