जळगाव – कापसाला भाव नसणे, वाढती महागाई, केळी पीकविमा न मिळणे, या समस्यांमुळे अस्वस्थ झालेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील वाकोद येथील ग्रामस्थांनी गावात आलेला भारत विकसित संकल्प यात्रेचा चित्ररथ परत गावाबाहेर काढला. भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ असून ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर हा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातील वाकोद हे सुमारे तीन-साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव असून, गावात पाणीप्रश्न, घरकुलांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तसेच कापसाला भाव नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यात दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईची भर पडत आहे. दुसरीकडे, शासन- जिल्हा प्रशासनातर्फे गाजावाजा करत शासकीय योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी एलईडी चित्ररथ गावागावांत फिरविले जात आहेत. मंत्री महाजन यांच्या मतदारसंघातील वाकोद गावात चित्ररथ आल्यावर अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती दिली जात असताना ग्रामपंचायत सदस्य ॲड. ज्ञानेश्वर राऊत यांच्या नेतृत्वात हा चित्ररथ गावातून माघारी परत पाठविण्यात आला. पाणी, घरकुल, महागाईसंदर्भात राऊत यांनी ग्रामविकास अधिकारी शिंदे यांना जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. चित्ररथावर असलेल्या मोदी सरकार या उल्लेखावर आक्षेप घेत सरकार कोणते आहे, भारत सरकार की मोदी सरकार, भारत मोठा आहे की मोदी मोठे, असे प्रश्न त्यांनी मांडले. शासकीय योजनांपासून तळागाळातील लाभार्थी वंचित आहेत. त्यांना योजनांच्या लाभासाठी पायपीट करावी लागत असताना नरेंद्र मोदींचा प्रचार शासकीय पैशांतून केला जात आहे, असे राऊत यांनी ग्रामविकास अधिकार्यांना खडसावले. गावातून चित्ररथाला बाहेर काढले.