धुळे – शिरपूर तालुक्यात गृप ग्रामपंचायत आंबे परिसरातील धवळीविहीर, अमरिशनगर आणि अंजनपाडा येथे भूगर्भात हालचाली होऊन विस्फोटसदृश्य गूढ आवाज येत आहे. असे आवाज का येत आहेत, याची सखोल चौकशी करावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटना आणि स्थानिकांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या परिसरात ३० ते ४० दिवसांपासून रात्री मोठे आवाज होत आहेत. भूगर्भात होणाऱ्या मोठ्या विस्फोटसदृश्य गूढ आवाजाने नागरिक भयभीत झाले आहेत.
हेही वाचा >>> नशिक : मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवामध्ये कोल्हापूर विभाग विजेता
कित्येक दिवसांपासून त्यांची झोप उडालेली आहे. भूगर्भात विस्फोट झाल्यासारखे जाणवते, भूकंपसदृश्य झटके बसतात, प्रसंगी भिंतीवरील भांडे खाली पडतात. वेगवेगळ्या चर्चांमुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण असून त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. सदर परिसरात भूगर्भात असे आवाज का होत आहेत, याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नाशिक विभाग बिरसा फायटर्सचे अध्यक्ष विलास पावरा, मुकेश पावरा, सुरसिंग पावरा, देवा पावरा, सुनील पावरा आदी उपस्थित होते.