नाशिक : विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी विधान परिषदेच्या विद्यामान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपल्याकडून पैसे घेतले होते. परंतु, उमेदवारी मिळाली नाही. नंतर पैसे परत करण्यातही कालापव्यय केला. अखेरीस कमी रक्कम परत केली, असा आरोप नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी शिवसेनेत (उद्धव ठाकरे) उमेदवारीसंदर्भात आर्थिक व्यवहारांविषयी टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. ठाकरे गटाचे पदाधिकारी पांडे यांनी गोऱ्हे यांच्या एकसंघ शिवसेनेतील कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेनेकडून आपण आणि तत्कालीन महानगरप्रमुख अजय बोरस्ते इच्छुक होतो. तेव्हा गोऱ्हे यांच्या नाशिकरोड येथील एका कार्यकर्त्याने उमेदवारीसाठी त्यांच्याकडे नेले. त्यांनी विशिष्ट रक्कम दिल्यास उमेदवारी देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे आपण काही रक्कम गोऱ्हे यांच्याकडे पोहोचती केली. परंतु, बोरस्ते यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आपण गोऱ्हे यांना १५ ते २० दिवस दूरध्वनी केले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही, असे पांडे म्हणाले.
विधान परिषदेच्या कामकाजासाठी पैसे घेतात राऊत
विधान परिषदेच्या कामकाजासाठी नीलम गोऱ्हे या पैसे घेतात, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. प्रश्नोत्तरासाठी गोऱ्हे यांच्या कार्यालयातून निरोप जातात, असा आरोपही त्यांनी केला. गोऱ्हे यांच्यामुळे विधान परिषदेची गरीमा खालावल्याची टीकाही त्यांनी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गोऱ्हे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.