लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: सुबक नक्षी कामासाठी स्थानिक बेसॉल्ट ऐवजी नेवाश्याच्या खाणीतून दगड, राजस्थानातून हत्ती आणि उंटावरुन संगमरवरी दगडाची वाहतूक, हा इतिहास आहे सध्या एका गटाच्या कथीत प्रवेशावरून वाद उफाळलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बांधकामाचा. मंदिराच्या बांधकामात अशा प्रकारे प्रादेशिक एकात्मता जोपासली गेली. गोदावरीच्या उगमस्थानी असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पेशवेकाळात या मंदिराचा जीर्णोध्दार होऊन भव्य मंदिर आकारास आले. मंदिराच्या बांधकामासाठी थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल ३१ वर्ष लागली होती. त्यासाठी दहा लक्षांहून अधिक खर्च झाल्याचा इतिहास आहे.
त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योर्तिलिंग आहे. या मंदिराच्या जीर्णोध्दाराची माहिती उत्तर महाद्वारालगत संस्कृतमधील शिलालेखावर दिलेली आहे. त्याचा दाखला देत त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी तथा विश्वस्त डॉ. सत्यप्रिया शुक्ल यांनी मंदिराचा इतिहास कथन केला. त्र्यंबकेश्वर हा मुसळधार पर्जन्यवृष्टीचा परिसर आहे. त्याचा विचार उभारणीत झाला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या पुढाकारातून १६७७ साली जिर्णोध्दाराच्या कामास प्रारंभ झाला. नानासाहेब पेशवे यांचे नातू माधवराव नारायण उर्फ सवाई माधवराव पेशवे यांच्या कार्यकाळात १७०८ मध्ये हे काम पूर्णत्वास गेले. मंदिराच्या उभारणीसाठी तीन दशकांहून अधिक काळ लागला.
आणखी वाचा-नाशिक: दरेगाव शिवारात तीन संशयित गुन्हेगारांना अटक
या कामात जेवढे संगमरवरी दगड लागले ते हत्ती, उंटांवरून राजस्थानमधून आणल्याचे सांगितले जाते. काळ्या पाषाणातील अर्थात बेसॉल्ट दगडातील हे मंदिर आहे. स्थानिक बेसॉल्ट तुलनेत कठीण असतो. त्यावर नक्षीकाम करता येत नाही. त्यामुळे मंदिराच्या उभारणीकरिता नेवाश्याहून खास बेसॉल्ट आणला गेला. त्या काळात दळणवळणाची साधने मर्यादित होती. दगड आणि तत्सम साहित्याच्या वाहतुकीत बराच वेळ लागत असे. पेशव्यांनी मंदिराच्या कामाची जबाबदारी नारायण भगवंत या कारकुनावर सोपविली होती. त्यांच्या देखरेखीत सुरू झालेले हे काम पुढे त्यांचा मुलगा नागेश नारायण यांच्या देखरेखीत पूर्ण झाले. कारागीर अव्याहतपणे काम करीत होते. मंदिरावर अतिशय सुरेख नक्षीकाम आहे. जेव्हा हे मंदिर आकारास आले, तेव्हा या प्रांतात इतके भव्य मंदिर नसल्याचे उल्लेख आढळतात.