लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा शब्दप्रयोग अजितदादा गटाचे छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अलीकडेच केला. यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केलेला आहे. राजकीय मंडळींकडून वारंवार करण्यात येणाऱ्या या शब्दप्रयोगास येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी आक्षेप घेतला आहे. विठ्ठ्ल मंदिरात बडवे म्हणून कुणी पुजारी नाहीत. विठ्ठ्ल मूर्तीचे हजारो वर्षे बडवे परिवाराने संरक्षण केले. राजकारण्यांकडून वारंवार केला जाणारा हा शब्दप्रयोग एखाद्या कुटुंबाचा अवमान करणारा असून तो थांबवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी हा शब्दप्रयोग केला होता. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडत असून त्यांना बाजूला करा, आपण सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडवू असे भुजबळ यांनी म्हटले होते. या गटातील अन्य काही नेत्यांनीही भाषणांमध्ये तो शब्दप्रयोग केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वारंवार हा शब्दप्रयोग केल्याचे महंत सुधीरदास यांनी निदर्शनास आणले आहे.
राजकारण्यांकडून सरसकट केला जाणारा हा शब्दप्रयोग अयोग्य आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आज बडवे म्हणून कुणी पुजारी नाही. परंतु, गेली हजार वर्ष ज्यांंनी विठ्ठलाचे पूजन केले, विठ्ठलाची मूर्ती सांभाळली, अफजलखानचा पंढरपूरवर हल्ला झाला असताना याच बडवे परिवाराने विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले, अशा कुटुंबाबद्दल अवमानकारक उद्गार काढणे योग्य नाही. भुजबळ, अजितदादा आणि राज ठाकरे यांनी वारंवार हा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुणीही आता हा शब्दप्रयोग करू नये, अशी अपेक्षा महंत सुधीरदास यांनी व्यक्त केली आहे.