नाशिक : जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात होणार असून सर्वात कमी २० फेऱ्या असणाऱ्या देवळाली आणि निफाड मतदारसंघाचे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक ३२ फेऱ्या असणाऱ्या दिंडोरीच्या निकालास वेळ लागण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्णत्वास नेली आहे. जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदान झाले. कळवणमध्ये सर्वाधिक ७८.४३ टक्के मतदान झाले आहे. १५ मतदारसंघात एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे. मतदानानंतर मतदान यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या सुरक्षा कक्षात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्हीच्या देखरेखीत ठेवण्यात आली. शनिवारी सकाळी आठ वाजेपासून संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रात मतमोजणीला सुरुवात होईल. सर्व मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने नेमलेल्या मतमोजणी निरीक्षकांच्या देखरेखीत पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निरीक्षकांच्या देखरेखीत पहाटे पाच वाजता नियुक्त कर्मचाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया होऊन संबंधित कर्मचाऱ्यांना टेबल नेमून दिले जातील. सकाळी साडेसात वाजता सुरक्षा कक्ष उघडले जातील. प्रारंभी टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू केली जाईल. केंद्रात नियुक्त कर्मचारी आणि मतमोजणी प्रतिनिधींना भ्रमणध्वनी वा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास प्रतिबंध आहे.

हेही वाचा…नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यांच्यात बदल ठाकरे गटाचा आरोप

प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी निरीक्षक यांच्या मान्यतेने पडताळणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी घोषित करतील. मतमोजणीअंती निवडणूक निरीक्षक आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत कोणतेही पाच मतदान केंद्र निवडून त्यांच्या व्हीव्ही पॅट चिठ्ठ्यांची पडताळणी मतदान यंत्रावरील उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांशी केली जाईल. मतमोजणीत प्रारंभी एक, दोन फेऱ्यांना वेळ लागतो. एकदा मोजणीने वेग पकडल्यानंतर एक फेरी साधारणत: ४० मिनिटांत पूर्ण होते. याचा विचार करता आधी कमी फेऱ्या असणाऱ्या मतदारसंघांचे तर जास्त फेऱ्या असणाऱ्या मतदारसंघांचे निकाल उशिराने जाहीर होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

फेऱ्यांनिहाय निकाल कसे लागतील ?

जिल्ह्यात निफाड व देवळाली या मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वात कमी म्हणजे २० फेऱ्या होतील. मतमोजणीला लागणारा वेळ लक्षात घेता या दोन्ही मतदारसंघांचे निकाल दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत हाती येण्याचा अंदाज आहे. त्यानंतर बागलाण (२१ फेऱ्या), नाशिक मध्य, चांदवड व इगतपुरी (प्रत्येकी २२ फेऱ्या), नाशिक पूर्व व येवला (प्रत्येकी २४ फेऱ्या), मालेगाव मध्य, सिन्नर, कळवण (प्रत्येकी २५ फेऱ्या), मालेगाव बाह्य (२६ फेऱ्या), नाशिक पश्चिम (३० फेऱ्या) आणि सर्वात शेवटी ३२ फेऱ्या असलेला दिंडोरी या क्रमाने निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.