Nashik District Vidhan sabha seats : नाशिक : विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी शहरातील चार केंद्र निश्चित करण्यात आली होती. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाच्या वतीने या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परंतु, पोलिसांचे नियोजन साफ कोलमडले. मतमोजणी केंद्राबाहेर वाहनांसह कार्यकर्त्यांच्या पडलेल्या गराड्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना कोंडीला तोंड द्यावे लागले.
मतमोजणीसाठी नाशिक पूर्व मतदार संघासाठी मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक मध्यसाठी मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक पश्चिमसाठी छत्रपती संभाजी स्टेडियम आणि इगतपुरी मतदार संघाच्या मतमोजणीसाठी शासकीय कन्या विद्यालय येथे केंद्र देण्यात आले होते. या केंद्रांकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद होते.
मतमोजणी केंद्रापासून ठराविक अंतरावर वाहने लावण्याचे निर्बंध होते. निकाल जाहीर होत असताना प्रत्येक फेरीगणिक कार्यकर्त्याची गर्दी वाढत गेली. कार्यकर्त्यांची वाहने, विजयोत्सव साजरा करण्यासाठी आणलेले ढोलताशे, अन्य वाहनांचा गराडा मतमोजणी केंद्राला पडला. काही समर्थकांनी रस्त्यात वाहने लावत केंद्र गाठले. त्यानंतर सुरू असलेला विजयोत्सव पाहण्यासाठी वाहन चालक आणि पादचारीही रस्त्यावर रेंगाळले. दुसरीकडे, मतमोजणी केंद्राकडे जाणारे लहान मोठे रस्ते बंद केल्याने वाहनचालक मिळेल त्या मार्गाने ये-जा करत असल्याने कोंडीत भर पडत गेली.
h
शहरातील शासकीय कन्या विद्यालयानजीक असलेला महात्मा गांधी रस्ता, अशोक स्तंभ, सीबीएस येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पायी चालणारेही विजयाच्या गुलालात रंगले. नाशिक मध्य मतदार संघातील दादासाहेब गायकवाड सभागृहाकडे जाणारा छान हॉटेललगतचा रस्ता भारतनगर झोपडपट्टी परिसर बंद असल्याने अन्य मार्गावर वाहनांची गर्दी राहिली. नाशिक पश्चिममध्ये संभाजी स्टेडियमकडे जाणारा रस्ता बंद केला होता. हॉटेल ताजकडून सातपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याने स्मार्ट सिटी बससह अन्य अवजड वाहनांना पुढे जाण्यात अडथळे आले. वाहनांच्या रांगा लागल्या.