नाशिक – प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. विभागातील ९० केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत आहे. शिक्षणसम्राट, साखर सम्राटांसारखे दिग्गज रिंगणात असल्याने शिक्षक मतदारांच्या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेतेही आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते. महायुतीतील बिघाडी, ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणारे दोन अपक्ष, बनावट मतदारांची नोंदणी, प्रलोभने दाखविण्याचे प्रकार अशा अनेक मुद्यांवरून ही निवडणूक चर्चेत आहे.

हेही वाचा – नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना दिलासा

मतदानाच्या दृष्टीने यंत्रणेने संपूर्ण तयारी पूर्णत्वास नेली. नाशिक जिल्ह्यात २९, अहमदनगर २०, जळगाव २०, धुळे १२ आणि नंदुरबार जिल्ह्यात नऊ केंद्रांवर मतदान होत आहे. नाशिक शहरातील १० मतदान केंद्रांसह सटाणा, येवला, निफाडसह मालेगाव ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन तर देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि मालेगाव शहरात प्रत्येकी एक केंद्र आहे. मतदानासाठी एका केंद्रावर पाच अधिकारी व कर्मचारी यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतदान कागदी मतपत्रिकेवर होत आहे. मतपत्रिकेवर पसंतीक्रम केवळ अंकामध्ये व एकाच भाषेत नमूद करावयाचा आहे. मतदानावेळी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक आहे. अन्य कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंटपेन किंवा इतर साहित्याचा वापर करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. निवडणुकीत सर्व केंद्रातील मतपत्रिकांची सरमिसळ करून मोजणी केली जाते. त्यामुळे कोणत्या केंद्रात, कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशील तयार केला जात नाही. मतदारांनी निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.

…अन्यथा मतपत्रिका बाद

मतपत्रिकेवर १ हा पसंतीक्रम लिहिला नसेल. १ हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास. पसंतीक्रम १ नक्की कोणत्या उमेदवाराला आहे, याचा बोध होत नसल्यास. पसंतीक्रम १ लिहिल्यानंतर त्याच उमेदवारासमोर २, ३, ४, ५ असे पसंतीक्रम लिहिल्यास पसंतीक्रम शब्दात नोंदविला असल्यास. पसंतीक्रमाबरोबरच इतर कुठल्यातरी प्रकारची खूण असल्यास ज्यामुळे मतदाराची ओळख पटेल. मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पसंतीक्रम लिहिल्यास मतपत्रिकेवर पसंतीक्रम वेगवेगळ्या भाषेत लिहिल्यास मतपत्रिका बाद होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटपाच्या तक्रारी; १० संशयित ताब्यात

जिल्हानिहाय मतदार

शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदारांमध्ये २२ हजार ८६५ महिला तर, ४६ हजार ५०२ पुरुष शिक्षक मतदार आहेत. सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत. यात १० हजार ५८९ महिला तर १४ हजार ७१३ पुरुष मतदार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार असून जळगावमध्ये १३ हजार १२२, धुळे जिल्ह्यात आठ हजार १५९ आणि नंदुरबारमध्ये पाच हजार ३९३ मतदार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting has started at 90 centers in nashik teachers constituency ssb
Show comments