मालेगाव : मालेगाव बाह्य मतदार संघातील या.ना.जाधव विद्यालय व निळगव्हाण प्राथमिक शाळा अशा दोन केंद्रांमधील मतदान यंत्रे नादुरुस्त झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही काळ ताटकळत बसावे लागले.

हेही वाचा…नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान

u

या.ना.जाधव विद्यालयात सकाळी ‘मॉक टेस्ट’झाल्यावर प्रत्यक्ष मतदान सुरू करीत असताना मतदान यंत्र सुरू होईना. नंतर विद्युत जोडणीत दोष असल्याचे लक्षात आले. हा दोष दूर झाल्यावर यंत्र सुरू झाले. त्यामुळे जवळपास १५ मिनिटे मतदारांना ताटकळत राहावे लागले. त्यामुळे मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहराजवळच असलेल्या निळगव्हाण येथे सकाळपासूनच मतदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. तेथील एका केंद्रावर ६५ मतदारांनी आपला हक्क बजावल्यानंतर अचानक मतदान यंत्र बंद पडले. ही बाब केंद्राध्यक्षांनी वरिष्ठांना कळविल्यावर तेथे तातडीने पर्यायी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. हे किरकोळ दोष दूर झाल्यावर तेथे सुरळीत मतदान सुरू झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले.