नाशिक – जिल्ह्यातील आदिवासीबहुल परिसरातील पाणी टंचाईसंदर्भात सोमवारी आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर गटविकास अधिकाऱ्यांची झालेली बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडली. बैठकीत पुन्हा एकदा शिष्टमंडळास आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरने पाणी पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले. शुक्रवारपर्यंत पाणी न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेने दिला आहे.
आदिवासीबहुल असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यांच्या काही भागात जानेवारीअखेरीस पाणी टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली. या तालुक्यांमधील काही गावांमध्ये केंद्र शासनाच्या हर घर जल योजनेचे काम सुरू आहे. कोट्यावधी रुपये खर्च या कामावर खर्च होत आहेत. गावात विहीर, जलवाहिनी असतानाही नळाला पाणी नाही, अशी स्थिती आहे. योजनेचे काम संथपणे सुरू असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या समस्येकडे एल्गार कष्टकरी संघटनेनेने शनिवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत टंचाईग्रस्त वाड्यांवर लवकरच टँकर सुरू करण्यात येतील, दोषींवर कारवाई होईल, या संपूर्ण प्रकाराची चौकशी होईल, असे आश्वासन देत सोमवारी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी गटविकास अधिकारी आणि मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ असे बैठक घेण्याचे ठरवले.
सोमवारी नियोजित बैठक पार पडली. बैठकीत मोर्चेकऱ्यांनी पाणी नसलेल्या गावांची यादी प्रशासनाला दिली. प्रशासनाने यादी घेत मंगळवारपासून अधिकारी संबंधित गावांची, पाड्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. काम संथपणे होत असल्याची कारणे काय, अद्याप गावांपर्यंत पाणी न पोहचण्याचे कारण काय, याविषयी संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. गावाचा पाणी प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात सुटण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. शुक्रवारपर्यंत पाणी न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.