धुळे – जिल्ह्यातील अनेर आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात अनेर मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्प परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात साठा वाढणार असल्याने धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडून १५ हजार ८८० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक आणि विसर्गही वाढण्याची शक्यता असल्याने अनेर नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.
हेही वाचा – नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे १८ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आल्याने ९८ हजार ६७० क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात विसर्ग होत आहे. स्थानिक नाल्यांद्वारेही पाणी तापी नदीपात्रात येत असल्याने पात्रात आवक वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेजमधूनही विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत, नदीपात्रामध्ये जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावेत, असा इशारा साक्री पाटबंधारे उपविभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे.