लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवावी. यंत्रणांनी अचूकतेने व पूर्ण क्षमतेने काम करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या चार निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिल्या.

जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक मतदार संघांत सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक तयारी व कामकाजाचा आढावा आयोगाकडून नियुक्त चारही निवडणूक खर्च निरीक्षक यांनी घेतला. जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आयोगाकडून दिंडोरीसाठी निधी नायर व मुकंबीकेयन एस. यांची तर नाशिक या लोकसभा मतदारसंघासाठी सागर श्रीवास्तव व प्रवीण चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारही खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून, निवडणूक प्रक्रियेचा संयुक्त आढावा घेतला.

आणखी वाचा-नाशिक : शांतीगिरी महाराजांची ‘श्रीमंती’, ३९ कोटींची मालमत्ता

आयोगाने प्रत्येक जबाबदारीसाठी सूक्ष्म मार्गदर्शक सूचना, कृती आराखडा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येकाने त्याला नेमून दिलेली जबाबदारी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे, चोखपणे व गांभिर्याने पार पाडावी. कोणतीही तक्रार येऊ देऊ नये, असे त्यांनी सूचित केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यात लोकसभा निवडणूक सुरळीतपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली. निवडणूक कामकाज व तयारीची माहिती याबाबत समन्वय अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील मतदार संघ, मतदान केंद्रे, विविध कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, विविध पथके आदींची माहिती सादर केली.

आणखी वाचा-नाशिक, दिंडोरीत पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयच्या नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सहायक अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, समन्वय अधिकारी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch out for suspicious financial transactions in elections expenditure inspector advises mrj
Show comments