नाशिक : लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रातील पाच पाटबंधारे विभागांनी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सिंचन आणि बिगरसिंचन पाणीपट्टीच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे १२७ टक्के वसुली केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच कोटींनी ही रक्कम वाढून १५७.३८ कोटींची वसुली झाली आहे. यात सिंचनासाठी दिलेल्या पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाणही अधिक आहे. या काळात सिंचन पाणीपट्टीची पावणेनऊ कोटींची रक्कम संबंधित विभागांना धरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मिळणार आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अंतर्गत नाशिक, पालखेड, मालेगाव, मुळा आणि अहिल्यानगर असे एकूण पाच पाटबंधारे विभाग आहेत, या पाचही विभागात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी सिंचन व बिगरसिंचन पाणीपट्टीसाठी १२३. ७२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पाचही विभागांनी मार्च २०२५ अखेरपर्यंत १५७.३८ कोटींची वसुली केली. गतवर्षी सिंचन व बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी १५३.३० कोटींची वसुली झाली होती. हे प्रमाण उद्दिष्टाच्या १३९ टक्के इतके होते.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात धरण, कालव्यातून शेतीला दिलेल्या पाण्याची पट्टी वसुलीत वाढ झाली आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अहवालानुसार २०२४-२५ वर्षात ७.९२ कोटींचे उद्दिष्ट दिले गेले होते. प्रत्यक्षात ८.७६ कोटी (११० टक्के) रुपये वसुली साध्य झाली. गतवर्षी सिंचन पाणीपट्टीचे १०.३२ कोटींचे उद्दिष्ट असताना ८.११ कोटी (७८ टक्के) वसुली झाली होती. सिंचन पाणीपट्टीची रक्कम संबंधित विभागांना धरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मिळते. त्यानुसार पाचही विभागांना पावणेनऊ कोटी रुपये मिळू शकतील.
बिगर सिंचन वापरकर्त्यांचे प्रमाण कमी असते. त्यांची पाणीपट्टी वसूल होते. शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचे वापरकर्ते अर्थात शेतकऱ्यांची संख्या मोठी असते. प्राधिकरणने जानेवारी २०२५ पासून सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने पाचही पाटबंधारे विभागांनी वसुलीसाठी पाठपुरावा केला. नियमित आढावा घेतला. त्यामुळे ही वाढ दृ्ष्टीपथास आली. शासनाच्या धोरणामुसार सिंचन पाणीपट्टीची रक्कम संबंधित विभागांंना धरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मिळणार आहे. राजेश गोवर्धने (अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक)
नाशिक | उद्दिष्ट | साध्य |
पाटबंधारे | ७९.७५ कोटी | ८९.८५ कोटी |
पालखेड | १६.७५ कोटी | २२.७५ कोटी |
मालेगाव | ४.७६ कोटी | ३.७८ कोटी |
मुळा | १२.४३ कोटी | २९.७४ कोटी |
अहिल्यानगर | १० कोटी | ११.२४ कोटी |