लोकसत्ता वार्ताहर

धुळे : साक्री शहरासह तालुक्यातील १६ गावांना टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने मालनगाव धरणातून २४ मार्च रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.कान नदीकाठावरील मालनगांव, खांडबारा, बोडकीखडी, दहिवेल, सातरपाडा, भोनगांव, बोदगाव, आमोडे, किरवाडे, सुरपान, घोडदे, ढेलीपाडा, अष्टाणे, छडवेल, पखरुन, कावठे आणि साक्री शहर या गावांना टंचाई जाणवू लागली आहे.

कान नदीकाठच्या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधिंनी मालनगाव प्रकल्पातून २०२५ साठी आरक्षित असलेले पिण्याचे पाणी सोडावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती.या मागणीनुसार मालनगांव मध्यम प्रकल्पातून साक्री तालुक्यातील १६ गावांसाठी १३२.५७ दलघफुपैकी ७५ दलघफु पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

मालनगाव प्रकल्पातून कालवाव्दारे पाणी सोडण्यात येणार असल्याने कालवा सांभाळण्यासाठी आणि चाऱ्या बंद ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गस्तीपथक नेमण्यात यावे. दिवस आणि रात्री मजूर उपलब्ध करुन देण्यात यावे. जेणेकरुन पाणी लवकर पोहचेल व पाण्याची चोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी आवर्तन सोडतेवळी नदीकाठच्या गावातील विहिरीवरील वीज वितरण बंद करण्याबाबत लेखी सूचना द्याव्यात, आवर्तन सोडण्यापूर्वी साक्री तहसीलदारांनी तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक तातडीने घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या आहेत.

आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्यात याव्यात आणि पुन्हा पाणी अडविले जाणार नाही, याबाबत संबंधित ग्रामस्थ आणि शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. नदीपात्रात बंधाऱ्याजवळ पिकांना पाणी देण्यासाठी टाकलेले पाईप पाणी सोडण्यापूर्वी काढून घ्याव्यात. नदीपात्रात केलेले मातीचे भराव काढून टाकावेत, असेही बजावण्यात आले आहे.