लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: गोंदे येथील वीज दुरुस्तीची कामे आणि शहरातील जलशुध्दीकरण केंद्र तसेच जलकुंभ दरम्यानच्या वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती यामुळे अवघ्या काही दिवसांत पुन्हा शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २९ एप्रिल रोजी वीज दुरुस्तीच्या कामामुळे मुकणे आणि गंगापूर धरणातील उपसा केंद्र बंद राहिले होते. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा त्या दिवशी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा त्यातील एका उपकेंद्राच्या दुरुस्तीचे कारण पुढे करण्यात आले आहे. प्रचंड उकाड्यात अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. कधीकधी कित्येक तास वीज गायब होते. त्यामुळे नाशिककर आधीच त्रस्तावले असताना आता त्यांना सक्तीच्या पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार आहे.
मनपाच्या मुकणे धरण उपसा केंद्रास महावितरणच्या गोंदेस्थित रेमंड उपकेंद्रातून वीज पुरवठा घेतला गेलेला आहे. या उपकेंद्रातील विद्युत दुरुस्तीची कामे करण्यासाठी वीज कंपनी शनिवारी वीज पुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे मनपाच्या विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. बहुधा ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने हा दिवस गंगापूर धरणातून शहरात पाणी पुरवठा होणाऱ्या व्यवस्थेतील दुरुस्तीसाठी निवडला आहे. गंगापूर धरण उपसा केंद्रातून शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर, नाशिकरोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणी पुरवठा केला जातो. या जलशुध्दीकरण केंद्रातून पुढे पाणी वेगवेगळ्या भागातील जलकुंभात जाते. या वितरण प्रणालीतील दुरुस्तीसाठी गंगापूर धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे मुकणे आणि गंगापूर या दोन्ही ठिकाणाहून शहरात होणारा पाणी पुरवठा शनिवारी बंद ठेवला जाईल. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे मनपाने म्हटले आहे.
आणखी वाचा- जारगाव शिवारातील गोदामात बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त
वीज दुरुस्ती कामांचा त्रास
पारा ४० अंशाच्या घरात गेला असताना शहराला पुन्हा एकदा एक दिवसीय सक्तीच्या पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महावितरणच्या कारभाराने नागरिक आधीच त्रस्तावले आहे. कधी दुरुस्तीची कामे तर कधी तांत्रिक दोषामुळे अनेक भागात कधीही आणि कितीही तास वीज गायब होते. प्रचंड उकाड्यात कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कधीकधी चार ते पाच तास वीज पुरवठा पूर्ववत होत नाही. अनेकदा विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची धास्ती सामान्यांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे २९ एप्रिलला विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गंगापूर व मुकणे धरणातील उपसा केंद्राचा वीज पुरवठा बंद ठेवला गेला होता. आता पुन्हा त्याच गोंदे उपकेंद्राच्या दुरुस्तीचे कारण दाखवून वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे.
पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. त्याबाबतचा निर्णय महिनाभर लांबणीवर पडला असला तरी वेगवेगळ्या कारणांस्तव शहराचा एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. पाणी बचतीसाठी अधिकृतपणे पाणी कपात लागू करणे आणि दुरुस्तीची कारणे देऊन पाणी पुरवठा बंद ठेवण्यात फरक आहे, याकडे याकडे जागरुक नागरिकांकडून लक्ष वेधतात.