नाशिक : सध्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने शहरासह जिल्ह्यात काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. नळांना तोट्या बसविणे, जल वाहिन्यांची गळती रोखणे आणि नागरिकांनी काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. जून, जुलैमध्ये जलसाठा, पावसाची स्थिती पाहून आठवड्यातून एक दिवस कपात करावी लागेल की नाही, यावर विचार केला जाणार आहे. तूर्तास नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी दुपारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजनाबाबत बैठक पार पडली. अल निनोच्या प्रभावाने पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याची सूचना केलेली आहे. त्या अनुषंगाने गेल्या महिन्यात आढावा घेतला गेला होता. तेव्हाच महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. या बैठकीत पुन्हा आढावा घेतला गेला. पाटबंधारे विभागाने लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये २५ हजार ४३० दशलक्ष घनफूट म्हणजे ३९ टक्के जलसाठा असल्याचे नमूद केले. धरणनिहाय जलसाठ्याची आकडेवारी मांडण्यात आली. काही धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. शहरी भागात कपात करण्यासारखी स्थिती नसल्याचे भुसे यांनी नमूद केले. जून, जुलैमध्ये परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. तेव्हा कपातीची गरज भासल्यास नागरिकांना विश्वासात घेऊन, पूर्वकल्पना देऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा >>> नाशिकच्या सीमेवर नव्याने ४३ उंट दाखल, पांजरापोळमधील दोन उंटांचा मृत्यू

नाशिक आणि मालेगाव महापालिका, सर्व नगरपालिका, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांशी संंबंधित विभागाने गेल्या महिन्यात पाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदविलेली आहे. त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे नियोजन पाटबंधारेने केले आहे. ग्रामीण भागात कुठे टंचाईची स्थिती निर्माण झाली तर कुठे टँकरने पाणी देता येईल, याचे नियोजन केले जाईल. प्रगती पथावर पाणी पुरवठा योजनांना गती देऊन त्या मुदतीआधी पूर्णत्वास नेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. पाण्याची बचत करून ऑगस्टपर्यंत पाणी पुरविता येईल. पुढी काळात जिथे गरज भासेल तिथे पाणी पुरवठ्याचा कालावधी काही वेळ कमी करण्यावर विचार केला जाईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मनमाड : पानेवाडीत इंधन कंपनीच्या प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक, महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

गळती रोखा

मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी कुठेही वाया जाऊ नये म्हणून नळ्यांना तोट्या बसविणे आणि जल वाहिन्यांची गळती रोखण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पाण्याची बचत केल्यास ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी नियोजन करता येईल. नागरिकांनी अंगणात सडा तसेच गाडी धुण्यासाठी विंधनविहिरीचे पाणी वापरावे. स्मार्ट सिटी व महापालिकांनी खोदकामात जलवाहिन्यांची तोडफोड करू नये, असे त्यांनी सूचित केले.

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणवेली हटविणार

नांदूरमध्यमेश्वर बंधारा परिसरात पाणवेली पसरल्या आहेत. त्यामुळे आसपासच्या गावांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. राज्यात पाणवेलींबाबत मध्यंतरी एक प्रयोग राबविला गेला होता. त्याची माहिती घेण्यास जिल्हा परिषदेला सांगण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेकडे पाणवेली काढण्याची यंत्रसामग्री आहे. तिचा वापर करून पाणवेली काढाव्यात, असे बैठकीत सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cuts decision after looking at the situation in june july ysh
Show comments