लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: मुबलक पाणीसाठा असताना विविध भागातील नळांना १० ते १२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील अल्पसंख्यांकबहुल भागातील नगरसेवक-नगरसेविकांनी महापालिकेच्या महासभेत हंडा मोर्चा आणला. यावेळी आंदोलक आणि सत्ताधार्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सभागृहात बोलू न दिल्याने आंदोलनकर्त्या नगरसेवक, नगरसेविकांनी सभात्याग केला. महापौर प्रतिभा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महासभा झाली.

महासभा सुरु असतानाच अचानक समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम या पक्षांचे नगरसेवक फातेमा अन्सारी, नाझिया पठाण, अमीन पटेल, साबिर शेख, उमेर अन्सारी, मुक्तार मंसूरी, सद्दाम मुल्ला, आसीफ मोमीन, लल्लू शेठ यांनी डोक्यावर हंडे घेऊन सभागृहात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी आंदोलकांच्या हातातील हंडे घेण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.

आणखी वाचा-रावेर तालुक्यात वादळी पावसाने नुकसानीचा आकडा ५८ कोटींपेक्षा अधिक

अल्पसंख्यांकबहुल भागातील समस्या सोडविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी कोणता निधी आणला. त्यांनी काय प्रयत्न केले, असे प्रश्न भाजपने विचारले. तसेच तुमच्या भागातील किमान ५० अवैध नळ जोडण्या काढून दाखवा, असेही आव्हान भाजपने दिले. त्यावर साबीर शेख यांनी हे पिण्याच्या पाण्यासाठीचे आंदोलन असून एमआयएमचे नाही, असे प्रत्युत्तर दिले. सभागृहात आंदोलनकर्त्या नगरसेवकांना बोलू न दिल्याने त्यांनी सभात्याग केला.