नाशिक : अखेरच्या टप्प्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील लहान मोठय़ा २४ धरणांमधील जलसाठा ६१ हजार ९२४ अर्थात ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण ९९ टक्के होते. तुर्तास पाच टक्क्यांचा फरक असला तरी परतीच्या पावसात ही तफावत भरून निघेल, असा अंदाज आहे. नाशिक शहरास पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण १०० टक्के भरले आहे. पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनद, माणिकपूंज, पुणेगाव अशी जवळपास १६ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट जलसाठा असून त्यातून साडेसात हजार क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे. पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, नागासाक्या आणि पुनद या धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
संततधारेमुळे पालखेड धरणातील विसर्ग १७५० वरून दुपारी सात हजार क्युसेस करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वरमधून सुमारे १९ हजार क्युसेसने विसर्ग होत आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपी (७३ टक्के), गौतमी गोदावरी (८६), आळंदी (९२ टक्के ) जलसाठा आहे. करंजवण (८६), वाघाड (८८), ओझरखेड (७३), मुकणे (८३) टक्के जलसाठा आहे. ही सात धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची निकड आहे.