सिंहस्थात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभनगरीत दाखल होत असताना, जलप्रदूषणाचा मुद्दा अद्याप ‘जैसे थे’ आहे. सिंहस्थ नियोजनात प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवला. अद्याप अनेक आखाडय़ांपर्यंत सुविधा पोहोचल्या नाहीत. पालकमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत, अधिकाऱ्यांचे कर्मचारी ऐकत नाहीत, अशी स्थिती असल्याचा आरोप पुरीचे शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी केला आहे.
कुंभमेळ्यानिमित्त प्रशासनाने पुरविलेल्या सोयी-सुविधा अपुऱ्या असून त्याबाबत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केल्यास दुर्लक्ष केले जाते. हा साधू-संतांचा अपमान असून प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही. कर्मचारी कोणालाच जुमानत नाहीत. प्रशासनाने लवकरच ही स्थिती नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षा शंकराचार्चानी व्यक्त केली. मागील शनिवारी जंगलीदास महाराजांच्या मिरवणुकीवर आक्षेप घेत साधूंनी हत्यारे घेत दहशत माजविली. आखाडय़ांमधील अंतर्गत वादाचा फटका भाविकांना बसला असून, या प्रकारामुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ही घटना घडल्यानंतर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केलेली नाही. पर्वणी काळात स्नान अथवा शाही मिरवणुकीत सहभागी होणारे हे केवळ भाविक आहेत. ते कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी किंवा आपल्या मागण्यांसाठी मोर्चात सहभागी होणाऱ्यांपैकी नाहीत, हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी सुनावले.
नाशिकमध्ये भाविक केवळ गोदास्नानाचे पुण्य पदरात पडावे म्हणून येत आहेत. मात्र अद्याप गोदावरीच्या प्रदूषणाची स्थिती प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेतलेली नाही. पाणी अद्याप साचलेल्या स्थितीत असून दरुगधीयुक्त आहे. अशाही स्थितीत भाविक स्नानासाठी येत आहेत. त्यांना मज्जाव नको. पोलिसांनी त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागले पाहिजे, असा सल्ला शंकराचार्यानी दिला.

Story img Loader