शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आ. निर्मला गावित यांच्या प्रयत्नाने इगतपुरी तालुक्यातील मुकणे, भावली या धरणातील एकूण जलसाठय़ापैकी २३३.५२ दलघफू पाणीसाठा या धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. मुंबईत मंत्रालयात मंगळवारी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत आ. गावित यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत इगतपुरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाबाबत हा निर्णय घेण्यात आला असून नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांना तसा शासकीय आदेश देण्यात आला असल्याची माहिती आ. गावित यांनी दिली.
याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ. गावित यांच्याकडे हक्काच्या पाण्यासाठी शासनदरबारी आपले वजन खर्ची करावे अशी मागणी केली होती. या बैठकीस आ. नरहरी झिरवाळ, आ. राजाभाऊ वाजे, आ. सीमा हिरे, आ. जयंत जाधव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यातील धरणांचे पाणी गत महिन्यात जायकवाडीत सोडले गेल्याने सगळी धरणे निम्म्यापेक्षाही रिकामी झाली आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगाम कसा निघणार या विचारात तालुक्यातील शेतकरी पडले होते. शासनाने जायकवाडीला पाणी दिल्याने तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झाला. अनेक आंदोलन झाली मात्र काहीच उपयोग झाला नाही. पाण्यासाठी अनेकांनी राजकारण केले, गटबाज्या दाखविण्यात आल्या. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील धरणांचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांसाठी आरक्षित करा आणि नंतरच हवे तेवढे पाणी घेऊन जा अशी मागणी आ. गावित यांनी शासनाकडे केली होती. या मागणीला मोठे यश आले असून मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील गोंदेदुमाला, पाडळी, कुऱ्हेगाव, जानोरी, बेलगाव, कुऱ्हे, अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य आणि नांदगाव बुद्रुक आठ गावांसाठी दारणा डोहापर्यंत मागणीनुसार होणाऱ्या आवर्तनासाठी सुमारे १२५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तर भावली धरणातून लाभ क्षेत्रातील फांगुळगव्हाण, भावली खुर्द, भरवज, निरपन, नांदगाव सदो, पांप्रिसदो, मानवेढे, तारांगण पाडा, तळोशी, तळोघ, बोरटेंभी, घोटी, इगतपुरी, देवळे, दौंडत, मानिकखांब, मुंढेगाव, उंबरकोण आदी गावांसाठी १०० दलघफू आणि इगतपुरी नगरपालिकेसाठी ८.५२ दलघफूइतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. हे पाणी शेती आणि पिण्यासाठी राखीव असणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा