नाशिक – एकिकडे मुसळधार पाऊस, भरलेली धरणे तर दुसरीकडे तहान भागवण्यासाठी सहा तालुक्यांतील ४५७ गाव-वाड्यांना १११ टँकरमधून पाणी पुरवठा. यंदाच्या पावसाळ्यात अशी विरोधी परिस्थिती दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, त्या चांदवड, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला आणि नांदगाव तालुक्यात आजही टँकरने तहान भागवावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रारंभीचे दीड महिने ओढ देणाऱ्या पावसाचे नंतर बहुतांश भागात आगमन झाले. ऑगस्टच्या सुरुवातीला कोसळलेल्या पावसाने संपूर्ण चित्र पालटले. एक जून ते सहा ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५३५ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी आतापर्यंत ५२० मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या ९७.३ टक्के पाऊस झाला. तीन, चार दिवसांत मोठी तफावत भरून काढली. १५ पैकी केवळ तीन म्हणजे नाशिक (८५ टक्के), इगतपुरी (६० टक्के), पेठ (९५ टक्के) या तालुक्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. उर्वरित १२ तालुक्यांत सरासरीच्या १०६ ते १७७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाल्याची आकडेवारी आहे. यामध्ये ज्या तालुक्यात टँकर सुरू आहे, त्यांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पावसामुळे लहान-मोठ्या २२ धरणांमध्ये सध्या ४० हजार ४६० दशलक्ष घनफूट म्हणजे ६१.६२ टक्के जलसाठा झाला. चार धरणे तुडुंब भरली असून नऊ धरणांतील जलसाठा ७५ टक्क्यांहून अधिक आहे. अनेक धरणांमधून विसर्ग करावा लागला. या स्थितीत अनेक गाव-पाडे अद्याप तहानलेली आहेत, हेच प्रशासकीय अहवालातून समोर आले.

हेही वाचा – नाशिक : जायकवाडीच्या अल्प जलसाठ्याची नाशिक, नगरला चिंता; धरण ६५ टक्के न भरल्यास पाणी सोडण्याची वेळ

तालुकानिहाय स्थिती

सध्या बागलाण तालुक्यातील २० गावे आणि दोन वाड्यांना (२२ टँकर), सिन्नर तालुक्यात नऊ गावे व १६४ वाड्यांना (२२), मालेगाव १७ गावे व ३४ वाडी (१९ टँकर), नांदगाव १२ गावे व ८९ वाडी (१९ टँकर), चांदवड सात गावे व ५८ वाडी (१२) आणि येवला तालुक्यात १७ गावे व २० वाड्यांना १७ टँकरने पाणी पुरविले जात आहे. सद्यस्थितीत एकूण १११ टँकरच्या २७३ फेऱ्या मंजूर आहेत. देवळा तालुक्यात टँकरसाठी २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ९४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यातील १९ गावांसाठी तर उर्वरित ७५ टँकरसाठी अधिग्रहीत करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दोन लाख ३० हजार ३०५ लोकसंख्या टँकर आणि अधिग्रहित विहिरींवर अवलंबून आहे.

हेही वाचा – नाशिक: खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची दशरथ पाटील यांची मागणी

सरासरीपेक्षा अधिक पाऊस

ज्या तालुक्यातील गाव-वाड्यांना टँँकरने पाणी दिले जाते, तिथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट कसे दूर झाले नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. चांदवड तालुक्यात आतापर्यंत ४८० मिलीमीटर म्हणजे, सरासरीच्या १६५ टक्के पाऊस झाला आहे. बागलाणमध्ये सरासरीच्या १४२, सिन्नर तालुक्यात ११९.५, मालेगाव तालुक्यात १२८, येवला १२९ आणि नांदगाव तालुक्यात १२८ टक्के पाऊस झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity crisis in nashik even in heavy rain water supplied to 457 villages by 111 tanker ssb